
उन्हाळ्यातील पाणी वितरण नियोजन करा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : पाणीपुरवठ्याचा थेट संबंध कुटुंबाचे स्वास्थ्य, महिलांचे स्वास्थ्य याच्याशी आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबद्दल कोणतीही तक्रार आली, तर ती विनाविलंब दूर झाली पाहिजे. तेवढी संवेदनशीलता अभियंत्यांनी दाखवावी. तसेच, उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तत्काळ तयार करावा, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता या सगळ्यांची बैठक आयुक्त बांगर यांनी घेतली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले.
ठाणे शहरातील कामांची पाहणी करताना पाणी वितरण, रस्त्यांच्या कामांमुळे वितरणात आलेल्या समस्या, जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीसाठी घेण्यात आलेला चार दिवसांचा शट डाऊन त्याचा संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यावर झालेला परिणाम या सगळ्याचा आढावा आयुक्त बांगर यांनी या बैठकीच्या प्रारंभी घेतला. पाणीपुरवठ्याविषयीच्या तक्रारींबाबत मिळणारी उत्तरे बेजाबदार असून या विभागातील बहुतांश अधिकारी यांचा चालढकल करण्याचा असल्याचे निरीक्षण आयुक्त बांगर यांनी नोंदवले. नागरिक किंवा लोकप्रतिनिधी यांच्यापैकी कोणाकडूनही तक्रार आली, तर ज्या गांभीर्याने त्या तक्रारी पाहिल्या पाहिजेत, त्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिले जात नाही. त्याबद्दल आयुक्त बांगर यांनी नाराजी व्यक्त केली.
......... ........
उन्हाळ्याचे नियोजन
या उन्हाळ्यात तापमान आणखी वाढेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची गरज वाढेल. त्या काळात पाणी कमी पडायला नको. दुरुस्तीची कामे या तीन महिन्यांत काढू नयेत. आपत्कालीन दुरुस्ती आवश्यक असेल, तर कमीत कमी काळात करावी. नागरिकांना कमी त्रास होईल, असे पाहावे. सलग २४ तास पाणी आलेच नाही, अशी वेळ येऊ देऊ नये. पावसाळ्यात रस्त्याच्या कोणत्या समस्या येतील, हे जसे पाहण्यास सुरुवात केली आहे, त्याचप्रमाणे कोणत्या भागात पाण्याची कोणती समस्या आहे, त्यावर उपाय काय, हे नकाशावर आखून त्याचे नियोजन करण्यात यावे. ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाण्याच्या स्रोतांकडून पाणी कमी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.