
बेटिंग प्रकरणात आठजण जेरबंद
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर): नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात सुरू असलेल्या महिला आयपीएल क्रिकेटच्या सामन्यावर ऑनलाईन बेटिंग लावणाऱ्या आठ सट्टेबाजांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्टेडियममध्ये छापा मारून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ मोबाईल, तसेच दीड लाखाची रक्कम जप्त केली.
नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये महिला आयपीएलचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी बसलेले काही व्यक्ती मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स या संघात सुरू असलेल्या लाईव्ह सामन्यावर बेटिंग लावत असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री डी. वाय. पाटील स्टेडियमवर मोबाईलवर बेटिंग खेळत असलेल्या अंकितकुमार हिंगड (३१), सौरभ नराणीवाल (३०), सुरेंद्रसिंग देवपूर (२८), आयुशकुमार हिंगड (२४), नीतेश मेहता (२६), पिंटुकुमार टेलर (३२), हरचरसिंग अरोरा (३६) आणि मनजितसिंग अरोरा (३०) यांना ताब्यात घेतले आहे.
------------------------------
बनावट कागदपत्रांच्या आधारे सीम कार्ड
महिला आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर बेटिंग लावताना पकडल्या गेलेल्या या टोळीने वापरलेले सिम कार्ड बोगस नावाने, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार पोलिसांकडून या टोळीची कसून चौकशी करण्यात येत आहे. या टोळीविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यासह, इंडियन टेलिग्राफ ॲक्ट, आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.