
होळीत मद्यपींना वाहतूक पोलिसांचा दणका
कल्याण, ता. ८ (बातमीदार) : होळी आणि धूलिवंदन काळात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांना कल्याण-डोंबिवलीमधील
वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. वाहनचालकांसोबत असणाऱ्या सहकाऱ्यांवरही कारवाई केल्याने तळीरामांचे चांगलेच धाबे दणाणले होते. शहरात होळी आणि धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणाच्या काळात दारू पिऊन वाहने आणि हुल्लडबाजी करू नका, असे आवाहन पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. दोन दिवस पोलिसांच्या सोबत वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करत वाहतूक नियम मोडणे आणि दारू पिऊन वाहनचालवणाऱ्यांना चांगलाच दणका दिला.
होळी व धूलिवंदनानिमित्त कल्याण पूर्वमधील वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने दारू पिऊन वाहन चालवणे आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या १६ तळीरामांवर कारवाई करण्यात आली. तसेच कल्याण पश्चिममधील वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश तरडे यांच्या पथकाने २३ तळीरामांवर कारवाई केली. डोंबिवलीमध्ये वाहतूक विभाग पोलिस निरीक्षक उमेश गीते यांच्या पथकाने ६ जणांवर कारवाई केली. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती कल्याण पश्चिम वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.