दादरमध्ये पदपथावर मोबाईल टॉवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादरमध्ये पदपथावर मोबाईल टॉवर
दादरमध्ये पदपथावर मोबाईल टॉवर

दादरमध्ये पदपथावर मोबाईल टॉवर

sakal_logo
By

शिवडी, ता. ८ (बातमीदार) ः दादर पश्चिम येथील एन. सी. केळकर मार्गावरील शिवाजी मंदिरसमोरील बस थांब्याजवळ पदपथावर खोदकाम करून मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्‍याने प्रवाशांना येथून प्रवास करणे कठीण झाले असून या टॉवरला स्थानिक रहिवाशांनीही विरोध केला आहे.
पदपथावर टॉवर उभारण्याच्या परवानगीविरुद्ध महापालिका मुख्य अभियंता सुनील राठोड यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन लेखी पत्राद्वारे या टॉवरला विरोध दर्शविला आहे. या वेळी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, उपशाखाप्रमुख अक्षय शिंगरे, संतोष देवरूखकर, अजय कौसाळे, समीर गुरव, गटप्रमुख हेमंत नाईक व स्थानिक रहिवासी विष्णू देवरकर उपस्थित होते.
पदपथ हे नागरिकांना चालण्याच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले असून यावर कोणताही व्यवसाय करण्यास देऊ नये, असे न्यायालयीन आदेश आहेत. असे असतानाही न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत मोबाईल टॉवर उभारला आहे. या टॉवरमुळे लहान मुलांसह ज्‍येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असल्याने या टॉवरला येथील स्थानिकांचा विरोध आहे. सदर मोबाईल टॉवर अन्य ठिकाणी हटविण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी व सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक विष्णू देवरकर यांनी केली आहे. या मागणीचे पत्र महापालिका मुख्य अभियंता सुनील राठोड यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाच्या सहकार्याने देण्यात आले आहे.

पालिकेने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी परवानगी दिली आहे की नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी करतो. त्‍यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- सुनील राठोड, मुख्य अभियंता, महापालिका