
पाणीटंचाईच्या झळा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राबवूनही पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. यंदाच्या वर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडूनही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहापूर तालुक्यातील ३६ गावपाड्यांवर पाणीटंचाईची झळ पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने भविष्यात पाणीटंचाईच्या झळा अधिकच भीषण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाणे हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात भातसा, तानसा आणि बारवी अशी मोठी धरणे आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुबलक प्रमाणात पाऊस झाला असून, धरणांच्या साठ्यातदेखील वाढ झाली होती. मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे वाढलेली उष्णता, त्यामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यांमुळे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. जिल्हा प्रशासनाकडून धरणांत असलेल्या मुबलक साठ्यामुळे पाणीटंचाईचे संकट तूर्तास टळले असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे धरण क्षेत्रांतील तालुक्यांमधील अनेक गावपाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात साधारणत: दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात पाणीटंचाईच्या समस्या भेडसावण्यास सुरुवात होऊन त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असतो. त्यात मागील वर्षी जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती.
---------------------------------
शहापूर तालुक्यावर संकट गडद
अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस होऊनही यंदा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. शहापूर तालुक्यातील नऊ गावे आणि २७ पाड्यांवर आठ टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईचे संकेत आतापासूनच मिळत आहेत.