
कचराकुंडीमुक्त नवी मुंबईला खो
वाशी, ता. ८ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने कचराकुंडी मुक्त संकल्पना राबवली आहे. याच अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये फक्त ३५० च्या कचराकुंड्या कार्यान्वित आहेत, पण कचराकुंडी हटवल्याने त्याच ठिकाणी अजूनही कचरा आणून टाकण्यात येत असल्यामुळे कचराकुंडी मुक्त शहराच्या संकल्पनेला शहरावासीयांनी हरताळ फासल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी कंबर कसली आहे. सकाळच्या वेळी पालिकेचे कर्मचारी स्वच्छतेकडे लक्ष देत आहेत, तसेच पालिकेने कचराकुंडी मुक्त शहर करण्याचा संकल्प केला आहे. पण पालिकेने ज्या ठिकाणी कचराकुंड्या हटवल्या आहेत. त्यात नवी मुंबईतील झोपडपट्टी भागांसह सिडको, गावठाण भागांमधील कचराकुंड्या कमी करण्यात आल्या आहेत, पण त्याच ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असून हॉटेल व्यावसायिकांसह नागरिकही आघाडीवर असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
------------------------------
कचराकुंडी मुक्त शहर करण्याचा पालिकेचा संकल्प आहे. त्यानुसार कचराकुंड्या हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनीही स्वतःहून सामाजिक भान जपत पालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत कचरा संकलन करणे अपेक्षित आहे.
- बाबासाहेब राजळे, उप-आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन, नमुंमपा