शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना गणवेश

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना गणवेश

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या वर्षी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. दरवर्षी शाळा सुरू होऊन अनेक महिने लोटल्यानंतरही हे साहित्य मुलांना मिळत नसते. यंदा मात्र विद्यार्थ्यांवर ही वेळ येणार नाही असा दावा प्रशासनाने केला आहे.

गेल्या वर्षीपासून महापालिका शाळांचा दर्जा वाढवण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, शाळांच्या इमारतींची रंगरंगोटी, शाळांच्या पटसंख्येत वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न, मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून सायकलवाटप यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये पहिल्यांदाच बदल झालेले दिसून आले; मात्र विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वेळेवर देण्याकडे दुर्लक्ष झाले होते. या वर्षी ही कसर भरून काढण्यात येणार आहे. पंधरा जूनला शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच हे साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
---------------------------
पटसंख्‍येत दीड हजाराने वाढ
महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती व ऊर्दू माध्यमाच्या ३६ शाळांमधून सुमारे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश, दप्‍तर, बूट, मोजे, पाण्याची बाटली, वह्या मोफत देण्यात येतात. दोन वर्षांपूर्वी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साडेसहा हजारापर्यंत घसरली होती; मात्र महापालिकेने सुरू केलेले डिजिटल वर्ग व शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांना महापालिका शाळेत प्रवेश घेण्याचे केलेले आवाहन यामुळे पटसंख्येत सुमारे दीड हजाराने वाढ झाली आहे.
-------------------------------------
आयुक्‍तांची सूचना
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात गणवेश व शैक्षणिक साहित्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा अद्याप अर्थसंकल्प जाहीर झाला नसल्यामुळे त्यासाठीची तरतूद स्पष्ट झालेली नाही; मात्र विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य शाळा सुरू होताच मिळाले पाहिजे, अशा सूचना आयुक्त दिलीप ढोले यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com