
पालघरमध्ये आदिवासी महिलांचा मोर्चा
पालघर, ता. ८ (बातमीदार) ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारताच्या मार्क्सवादी-लेनिनवादी पक्ष लालबावटा व वसई येथील लोकशाही महिला संघटनेच्या वतीने वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी मोर्चा काढून वाढत्या महागाईला जबाबदार असणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली आहेत; मात्र आजही आदिवासी तरुणांच्या हाताला काम नाही. महागाईने अक्षरशः कंबरडे मोडले आहे. रेशनिंग दुकानांवर रॉकेल मिळत नाही आणि गॅस सिलिंडरचे दर अकराशे रुपयांच्या वर गेले आहेत. वसई महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या आणि अशा प्रश्नांसंदर्भात हे आंदोलन होते. या वेळी लोकशाही महिला संघटनेच्या अध्यक्षा कॉ. सीता जाधव, कॉ. मथुरा भोईर, भारती जाधव, अनिशा वाघ, अरुणा मुकणे, शेरू वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने मोर्चेकरी महिला उपस्थित होत्या. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. ‘आमच्या प्रश्नाकडे सरकारने जर लक्ष दिले नाही, तर आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल,’ असा इशाराही या वेळी महिलांनी दिला.