
रस्ता-खड्ड्याची थेट तक्रार!
मुंबई, ता. ८ : आपल्या भागातील रस्ता खचला, खड्डा पडला वा रस्त्यावर कचऱ्याचा ढीग जमा झाला असेल किंवा अगदी आरोग्याशी संबंधित काही तक्रार निर्माण झाल्यास मुंबईकरांना आता थेट पालिकेच्या हेल्पलाईनवर (८९९९-२२-८९९९) तक्रार करता येणार आहे. तक्रार करण्यासाठी अद्ययावत अशा ‘इंटेलिजंट व्हर्च्युअल असिस्टंट’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तक्रार केल्यानंतर संबंधिताला पाठपुरावा करण्याची गरज भासणार नाही. तक्रारीबाबतचे अपडेटस् त्याला मिळणार असून कोणाशी संपर्क करायचा, याचीही इत्थंभुत माहिती त्याच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
महापालिकेने मुंबईकरांसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणले आहे. त्यानुसार पालिका कार्यालय, रुग्णालये, दवाखाने, कोविड केअर सेंटर, शाळा, उद्याने, पर्यटनस्थळे, अग्निशमन केंद्रे आदी ८० हून अधिक सुविधांची माहिती ८९९९-२२-८९९९ क्रमांकावर व्हॉट्सॲप ‘चॅट-बॉट’द्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. पालिकेच्या व्हॉट्सॲप ‘चॅट-बॉट’मुळे तब्बल ८० पेक्षा अधिक सुविधा नागरिकांना सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत. ‘चॅट-बॉट’वर आतापर्यंत १ लाख ९७ हजार २९९ मुंबईकरांनी संपर्क साधला आहे. व्हॉट्सॲप ‘चॅट-बॉट’मुळे नागरिकांना घरबसल्या गणेशोत्सव मंडप परवानग्या, आपल्या विभागाची माहिती, संबंधित संपर्क क्रमांक इत्यादींसारखी विभागस्तरीय माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे.
जगभरात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला जात आहे. वेगाने पुढे जात असलेल्या तंत्रज्ञानाचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल यासाठी मुंबई महापालिकेकडून सतत प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘चॕट-बॉट’ आणखी अद्ययावत
तक्रार करण्यापासून तक्रारदारास पुढील अपडेटस् वेळोवेळी मिळावेत म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हॉट्सअॅप ‘चॅट-बॉट’ आणखी अद्ययावत करण्यात येत आहे. ‘इंटेलिजंट व्हर्च्युअल असिस्टंट’सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी करण्यात येणार आहे.
अशी करा तक्रार
- ८९९९-२२-८९९९ क्रमांकावर तक्रार नोंदवा. तक्रार निवारणाचे अपडेटस् वेळोवेळी मिळत राहणार
- ‘चॕट बॉट’च्या माध्यमातून अपडेटेड संदेश मिळणार
- तक्रार करण्यासाठी इंटेलिजंट व्हर्च्युअल असिस्टंट तंत्रज्ञानाचा वापर
- आणखी कोणाशी संपर्क करायचा याचाही तपशील मोबाईलवर समजणार