‘एशियाटिक’च्या वार्षिक अनुदानाचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एशियाटिक’च्या वार्षिक अनुदानाचा मार्ग मोकळा
‘एशियाटिक’च्या वार्षिक अनुदानाचा मार्ग मोकळा

‘एशियाटिक’च्या वार्षिक अनुदानाचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ ः निधीअभावी आर्थिक अडचणीत असलेल्या एशियाटिक सोसायटीला वार्षिक एक कोटी रुपये अनुदान देण्याच्या प्रस्तावाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आज (ता. ८) प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे पुढील वर्षापासून एशियाटिक सोसायटीला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एशियाटिक सोसायटीला दिला जाणारा निधी हा वेतनेतर असून तो खर्च करताना सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत. हा निधी प्रामुख्याने नियतकालिके, पुस्तकांची खरेदी, प्रक्रिया प्रयोगशाळा संवर्धन आणि मायक्रोफिल्मिंग लॅबच्या खर्चासाठी वापरायचा आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेकडूनही एशियाटिकला वार्षिक एक कोटींचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल त्यासाठी अनुकूल असल्याचे समजते. राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर महापालिका अनुदान देईल, असे आश्वासनही चहल यांनी दिले होते.
दरम्यान, तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ३० मे २०२२ ला एशियाटिक सोसायटीच्या समस्येबाबत बैठक झाली होती. त्यात राज्य शासनाकडून एशियाटिक सोसायटीला वार्षिक एक कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्यासाठी योजना प्रस्तावित करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले होते.
--
कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या कायम
राज्य सरकारकडून दिला जाणारा निधी एशियाटिक सोसायटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांवर खर्च करता येणार नाही. संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने करावा, असे शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित राहणार आहे; सरकारकडून मिळणारी मदत ही मोठी आहे. त्यामुळे आम्ही आनंदी असल्याची प्रतिक्रिया एशियाटिकच्या कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.