
विरारमध्ये आजपासून भव्य शिवोत्सव
वसई, ता. ९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला शिवोत्सव कार्यक्रम विरार पश्चिम येथील विराट नगर मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी यशवंतनगर अमेय क्लासिक क्लबपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवोत्सवाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी ४ वाजता होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी मुग्धा लेले, ग्रीष्मा पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, अजीव पाटील, माजी महापौर राजीव पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शालेय विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नाट्य सादर करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. ११) इतिहासतज्ज्ञ आप्पा परब, सौरभ कर्डे यांचे व्याख्यान, प्रणय शेलार व आलीम यांच्यातर्फे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार असल्याची माहिती या वेळी ग्रीष्मा पाटील यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील प्रसंगांवर आधारित स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या रांगोळ्या, शत्रूशी युद्ध करताना कोणत्या युद्ध साहित्याचा वापर शिवरायांनी केला, ते साहित्य कसे होते, त्यांचे प्रत्यक्ष दर्शन रसिकांना होणार आहे. त्यात विविध तलवारी, भाले, ढाली, तोफा, तोफगोळे यांचा समावेश असणार आहे. याशिवाय विविध व्याख्याने, पोवाडे, मर्दानी खेळ, नाट्य असे अनेक कार्यक्रम यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती संदेश जाधव यांनी दिली. इतिहास प्रेमी, दुर्गमित्र व वसईकरांनी शिवोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षिका मुग्धा लेले यांनी नागरिकांना केले आहे.