बेकायदा रसायनांची वाहतूक जीवघेणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा रसायनांची वाहतूक जीवघेणी
बेकायदा रसायनांची वाहतूक जीवघेणी

बेकायदा रसायनांची वाहतूक जीवघेणी

sakal_logo
By

भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : भिवंडीमधील गोदामात गेल्या काही वर्षांपासून रासायनिक ड्रमचा साठा केला जात असून, हाच साठा शहरातील मोठ्या व भयानक आगीचा ‘हॉटस्‍पॉट’ बनला आहे. रासायनिक ड्रमच्या बेकायदा वाहतुकीवर अंकुश लावून पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे; मात्र अशाप्रकारे भिवंडी शहर आणि परिसरातदेखील ज्वलनशील रसायनाची बेकायदा वाहतूक करून त्याचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रासायनिक वस्‍तूंची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलिस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या विविध व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रासायनिक वस्तू अथवा द्रवरूपात असलेल्या सीलबंद ड्रमची वाहतूक सुरू असते. शहरात सुरू असलेल्या डाईंग व मोती कारखान्यात अशाप्रकारच्या रसायनाचा वापर होतो. त्याकरिता अनेक डाईंग, सायझिंग आणि मोती कारखाना मालकांकडे रसायने साठवणूक करण्याचा परवानादेखील नसतो. हीच वस्तुस्थिती ग्रामीण भागातील गोदामांची असून, त्यामध्येदेखील विनापरवाना ज्वलनशील रासायनिक वस्तू अथवा रासायनिक द्रव्यांची साठवणूक केली जाते. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात या ठिकाणी साठवलेल्या रसायनास भयंकर आग लागते.
----------------------------
मानवी जीवास धोका
गोदामात अथवा शहरातील डाईंग, सायझिंग आणि मोती कारखान्यात हे रसायन पोहोचवण्याचे काम खासगी वाहतूकदार करीत असून, त्यांच्याकडेदेखील अनेक वेळा रसायने वाहतुकीचे परवाने नसतात. त्यामुळे शहरातील मानवी जीवास धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारे बेकायदा रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरदेखील पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
------------------------------------------------
दणका...
नारपोली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पूर्णा गावातील ईताडकर कंपाऊंडमध्ये योगेश्वर वेअर हाऊस येथे मोठ्या टेम्पोमधून आलेले रसायनाचे २०० लिटर क्षमतेचे २६ प्लास्टिकचे भरलेले ड्रम जप्त केले.

रसायनाने भरलेल्या ड्रमचा माल ठाण्याच्या वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या समोर राहणाऱ्या शरद हरी पवार यांनी रत्नागिरी येथील अरोमा इंटरमीडिएटस लोटे परशुराम यांच्याकडून खरेदी केला. सार्वजनिक रस्त्यावरून मोठ्या टेम्पोने चालक प्रसाद पांडे याच्यामार्फत तो पूर्णा येथे आणला.

विनापरवाना अतिज्वलनशील रसायनाची वाहतूक करून सुरक्षितता न बाळगता नागरिकांच्या जीवास धोका केल्याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक प्रसाद पांडे आणि केमिकल ट्रेडिंग करणारे शरद हरी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून केमिकलचे ड्रम जप्त केले आहेत.
-------------------------------------------
गोदामात रसायनाचा स्फोट होऊन आग लागण्यापूर्वी रसायनाच्या ड्रमची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व पुरवठा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्याप्रमाणे शहरातदेखील अशा प्रकारे बेकायदा वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- नवनाथ ढवळे, पोलिस उपायुक्त, भिवंडी.