
ठाण्यात आगीच्या चार घटना
ठाणे, ता . ९ (वार्ताहर) : ठाण्यात होळी आणि धुळवडीच्या दिवशी आगीच्या चार घटना घडल्या. सोमवारी मध्यरात्रीनंतर आणि मंगळवारी पहाटे १२.१० वाजण्याच्या सुमारास अनमोल मेन्शन सोसायटीजवळ महावितरणच्या ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन ऑईल टँक लीकेज झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नौपाडा पोलिस कर्मचारी, महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी विद्युत पुरवठा खंडित करून गळती होत असलेला ऑईल टँक बंद करण्यात आला. दुसरी घटना मंगळवारी पहाटे १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. कोविड हॉस्पिटलच्या ठिकाणी महावितरणच्या विद्युत केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने प्रसंगावधानाने अग्निशमन दलाने त्वरित विद्युत पुरवठा खंडित करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आगीची तिसरी घटना मंगळवारी पहाटे १२.५५ वाजण्याच्या सुमारास घडली. रेप्टाक्रॉस कंपनीच्या आवारात कचऱ्याला आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांनी आगीवर नियंत्रण मिळवले; तर चौथी आगीची घटना मंगळवारी सकाळी ९.२६ वाजण्याच्या सुमारास रेनबो इंटरनॅशनल स्कूलजवळ महावितरणच्या पोलवरील इलेक्ट्रिक केबलला शॉर्टसर्किट होऊन किरकोळ आग लागली होती.