
घोडबंदर मार्ग अधिक गतिमान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : घोडबंदर महामार्गावरील मानपाडा ते गायमुखपर्यंतच्या रस्तारुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी वन विभागाची जमीन अखेर ठाणे महापालिकेला वर्ग होणार आहे. मुंबईत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी यासंदर्भाचे आदेश वनविभागाला दिले आहेत. पावसाळ्यात या पट्ट्यात डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करण्यासह रुंदीकरणाचे काम हाती घेणे महापालिकेला शक्य होणार असल्याने घोडबंदर मार्ग आणखी वेगवान होणार आहे.
मानपाडा, कासारवडवली, गायमुख या परिसरामध्ये येणारी वनखात्याची काही जमीन ही घोडबंदर महामार्गावर मधोमध आहे. पूर्वी त्या जमिनीचा त्रास होत नव्हता, परंतु दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढली आहे. याशिवाय पावसाळ्यात उंचावरून येणारे दगड-धोंडे तसेच पाण्यामुळे या पट्ट्यामध्ये अपघातांची मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे वनखात्याचा हा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आल्यास येथे पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची बांधणी व रस्तारुंदीकरण करणे सोपे जाणार होते, पण सातत्याने मागणी करूनही वनखात्याची त्याला मंजुरी मिळत नव्हती. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात एक बैठक झाली. या वेळी ही जागा ठाणे महापालिकेला वर्ग करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पावसाळ्यापूर्वी दिलासा द्या
घोडबंदर महामार्गावरील वनखात्याची जमीन ताब्यात आल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने लवकरात लवकर त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी गटार व रस्त्याची बांधणी करून जनतेला हा रस्ता खुला करावा, अशी अपेक्षा आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.