
स्त्रियांनी जगण्याची उमेद जागवावी
वडाळा, ता. ९ (बातमीदार) ः स्त्रियांची सामाजिक प्रगती निश्चितपणे झाली; परंतु त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागृती कधीही दिसून आली नाही. तेव्हा सदैव दुसऱ्याची काळजी वाहणाऱ्या स्त्रियांनी आता तरी स्वतःसाठी जगण्याची उमेद जागवावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या होमिओपॅथीक विभागाच्या प्रमुख डॉ. रूपाली जाधव यांनी केले आहे. जागतिक महिला दिनी परेलच्या मनोहर फाळके सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. रूपाली जाधव उपस्थित होत्या. घरेलू महिला कामगार, कार्यालयीन कर्मचारी, स्वयंरोजगार, गिरण्यातील महिलावर्ग आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होता. डॉ. जाधव म्हणाल्या की, परंपरेचे ओझे शिरावर घेऊन जगणाऱ्या स्त्रियांना मानसिक ताण तणावापासून दूर राहता आले पाहिजे. स्त्रियांच्या अनेक अजारात गोळ्या खाऊन आजार बरा होतो, हा एक प्रकारे गैरसमज आहे. स्त्रियांमध्ये मानसिक स्वास्थ्य अधिक महत्त्वाचे असते. त्यासाठी योगासने, नृत्य, गायन हे छंद त्यांनी जोपासले पाहिजेत, असेही डॉ. जाधव म्हणाल्या.
या वेळी गं. द. आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजच्या शिक्षिका वैशाली हेगडमल, वाचनालयाच्या प्रभारी ग्रंथपाल ममता घाडी, प्रियांका परब, मेघना आसबे, राष्ट्रवादी महिला विभागाच्या संगीता राऊळ, दीक्षा गुजर आदींनी आपल्या भाषणात ज्याज्या स्त्रियांनी अतुलनीय इतिहास घडवून महिलांमध्ये प्रेरणाशक्ती निर्माण केली, त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.