
मार्वे रोडवर दुभाजक बनवण्यास सुरुवात
मालाड, ता. ९ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील मार्वे रोडवर ऑर्लेम चर्चसमोर मुंबई महापालिकेच्या वतीने दुभाजक बसवण्यास सुरुवात झाली आहे. ऑर्लेम येथे दुभाजक नसल्याने अनेक प्रसंगी दुर्घटना घडल्या आहेत; त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून पालिकेकडे स्थानिकांनी तसेच पादचाऱ्यांनी दुभाजक बसवण्याची मागणी केली होती. अखेर पालिकेने दुभाजकाचे काम सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मार्वे रोड परिसरात दोन शाळा, रुग्णालय तसेच बँक आणि चर्च असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्ता ओलांडणे धोकादायक बनले होते. दुभाजक नसल्याने अनेकदा लहान-मोठे अपघातही झाले होते. त्यामुळे नागरिकांनी येथे दुभाजक बसवण्याची मागणी केली होती. अखेर पालिकेने काम सुरू केले असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.