
सेलिब्रेशन ग्रुपतर्फे कबड्डी स्पर्धा उत्साहात
दिवा, ता. ९ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थ मंडळ, डायघर यांच्या सहकार्याने होळीनिमित्त सेलिब्रेशन ग्रुपमार्फत होलिका महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दोन दिवस कबड्डी स्पर्धादेखील आयोजित केल्या होत्या. होळी सणात पोलिस पाटील यांचा मानाचा नारळ त्यांच्या घरून वाजत गाजत लहान मुलांना वधू-वर बनवून वरात काढून होळीच्या ठिकाणी आणण्यात आला. डायघर गावातील सर्वच बँडच्या ठेक्यावर नाचत पोलिस पाटील यांच्या घरापासून होळीच्या मैदानापर्यंत पोहचले. होळीनिमित्त गावातील १३ ते २० व २० ते २५ वर्षे अशा वयोगटातील मुलांसाठी कबड्डी स्पर्धा पार पडली. ८ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. आई गावदेवी संघ व भक्त प्रल्हाद संघ उपांत्य फेरीसाठी पोहचले. अंतिम सामना होळीच्या दिवशी खेळवण्यात आला. यामध्ये भक्त प्रल्हाद संघ उपविजेता; तर आई गावदेवी संघ विजेता ठरला.