रिक्षाचालकांचा मनमानी कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकांचा मनमानी कारभार
रिक्षाचालकांचा मनमानी कारभार

रिक्षाचालकांचा मनमानी कारभार

sakal_logo
By

वाशी, ता. १५ (बातमीदार) : रिक्षामध्ये नियमानुसार केवळ तीन प्रवासी नेण्याची मुभा आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करत रिक्षाचालक सर्रास क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रिक्षातून नेतात. नवी मुंबईत तर चार ते पाच प्रवासी एका रिक्षातून नेले जात असून प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. इतकेच नाही तर येथील अनेक रिक्षांमध्ये मीटर नसल्याने रिक्षाचालक प्रवाशांकडून अधिकची भाडेवसुली करत आहे.

नवी मुंबई शहरात काही ठिकाणी चालणाऱ्या रिक्षा या १५ वर्षांपेक्षा जास्त झाल्यानंतरही रस्त्यावर धावत आहेत. अशा वेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते. शिवाय, या रिक्षांना मीटर नसून त्या शेअर पद्धतीने चालवल्या जातात. नवी मुंबईतील अनेक रिक्षांमध्ये मीटर बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानी भाडेवसुली करत असतात. आता तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात आहेत. रिक्षामध्ये केवळ तीन प्रवासी नेण्याची मुभा असतानाही चार, तर कधी पाच प्रवासी नेले जातात. दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, महापे एमआयडीसी परिसर आदी ठिकाणी तर पाच प्रवासी बसवले जातात. तीन प्रवासी मागील आसनावर, तर दोन प्रवासी रिक्षाचालकाच्या आजूबाजूला बसवतात. या वाहतुकीकडे पोलिसांचे लक्ष नसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिक्षात बसलेल्या प्रवाशांचा जीव सतत टांगणीला असतो.

प्रवाशांचे हाल
अनेक ठिकाणी पाच प्रवासी घेतल्याशिवाय रिक्षा सुरूच होत नाही. शेअर रिक्षाचे भाडे प्रति प्रवासी १० ते १५ रुपये असते. त्यामुळे रिक्षाचालकाला एका फेरीमागे ६० रुपये मिळतात. रिक्षात बसलेल्या प्रवाशांना दाटीवाटीने आणि आखडून बसावे लागते. महिला प्रवाशांचे यात खूप हाल होतात.

कारवाईकडे दुर्लक्ष
एकीकडे मीटर लावणे बंधनकारक असताना नवी मुंबई शहरात काही रिक्षांना मीटर लावण्यात आलेले नाहीत. वाहतूक पोलिस इतर वाहनांवर कारवाई करतात; मात्र मीटर नसलेल्या रिक्षांवर; तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करताना दिसून येत नाही.

मीटर नसल्याने रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात. विशेष रिक्षा करून जायचे असल्यास ३० ते ४० रुपये भाडे द्यावे लागते. त्यामुळे नाइलाजाने शेअर रिक्षात बसावे लागते. आम्ही शेअर रिक्षात बसतो; पण चार प्रवासी आल्याशिवाय रिक्षा सुरू करत नाही. दुपारच्या वेळी खूप वेळ वाट बघावी लागते.
- प्राजक्ता काळे, महिला प्रवासी

रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याचे आढळल्यास अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत असते.
- हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई