
नवी मुंबईचा पारा ४० अंशांकडे
वाशी, ता. ९ (बातमीदार) : वातावरण बदलाचा परिणाम यंदा चांगलाच जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने नवी मुंबईकरांसह पनवेलकर घामाघूम होत आहे. मार्च महिन्यात तर तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत गेला आहे. उकाडा वाढत असल्याने डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास नागरिकांना होत आहेत.
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. तापमानाचा पारा ४० अंशांपर्यत गेलेला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची लाहीलाही होत आहे. दुपारच्या उन्हात फिरताना नागरिक घामाघूम होत आहेत. उन्हातून काही मिनिटे चालत राहिले, तरी अंग भाजून निघते. दुचाकीवरून जाताना तर उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र होतात. यात घसा सतत कोरडा पडत असतो. तसेच डोकेही तापून निघते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी काही प्रमाणात कमी होते. उन्हाच्या झळांचा त्वचेइतकाच डोळ्यांनाही होतो. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी टोपी, स्टोल आणि कूल गॉगल्सचा वापर वाढला आहे. अडगळीत पडलेल्या छत्र्याही काही जणांनी बाहेर काढल्या आहेत. प्रखर उन्हात डोक्यावरून स्टोल घेतला तरी चेहर्याला चटके बसत असल्याने तरुणी झळापासून बचाव होण्यासाठी चेहराही झाकण्याचा प्रयत्न करतात.
दिवसेंदिवस पार वाढत असल्याने डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर आदी त्रास नागरिकांना होत आहेत. सायंकाळी आणि रात्रीदेखील हवा गरम असते. त्यामुळे यंदाचा उकाडा नवी मुंबईसह पनवेलकरांना त्रासदायक ठरत आहे.
थंड पेय प्रमाणात आवश्यक
शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून थोड्या-थोड्या वेळाने पाणी पिणे आवश्यक आहे. लिंबू, साखरपाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते. उन्हाळ्यात थंड पेय, आइस्क्रीम, बर्फाचा गोळा अशा पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढते. या पदार्थांमुळे तात्पुरते बरे वाटते; पण याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो. अतिथंड पदार्थ खाल्ल्यामुळे घसा बसणे, खोकला असेही त्रास होत आहेत.
दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी, पोट बिघडण्याच्या तक्रारी वाढत आहेत. तहान जास्त लागली तरीही पाणी पिताना काळजी घ्यायला हवी. घरातले स्वच्छ पाणी प्यावे. सध्या ताप, घसादुखी, पोटदुखीचा त्रास होणारे रुग्ण वाढले आहेत.
- डॉ. विनायक पाटील
----
पक्ष्यांनाही फटका
अवकाळी पाऊस, तर कधी उष्म्याचा वाढता तडाखा यामुळे माणसांना त्रास तर होतो; मात्र पक्ष्यांना तर अधिक पटीने होत असतो. वाढत्या तापमानात उडताना पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना पक्षी गळून कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.
नवी मुंबईतील तापमान ४० अंशांपर्यंत झेप घेत आहे. निसर्गात होणाऱ्या या बदलत्या हवामानाचा फटका पक्ष्यांना बसत आहे. पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना ते कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. पक्षी उष्ण रक्ताचे असून त्यांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०५ पिरॅमिड अंश इतके असते. शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी पंख पसरवून तोंडाने श्वसनक्रिया करतात. त्यामुळे ते उन्हाळ्यात बऱ्याचदा आपली चोच उघडून बसलेले असतात. त्यांचे शरीर अनेक प्रकारच्या पिसांनी आच्छादलेले असले तरी दुपारच्या वेळेत त्यांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. अशा वेळी त्यांच्या शरीराची ऊर्जा कमी होते आणि ते गळून पडतात. असा प्रकार नवी मुंबईत घडत असल्याचे निसर्गप्रेमी अॅड. विशाल मोहिते यांनी सांगितले.
पक्षिदया महत्त्वाची
रस्त्यात एखादा पक्षी पडलेला असेल किंवा जखमी असेल, तर अशा पक्ष्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवून शक्य झाल्यास टरबूज वा कलिंगडासारखी फळे खायला द्यावीत. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी बाल्कनी, गच्ची अथवा जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करावेत, असे आवाहन निसर्गप्रेमी अॅड. विशाल मोहिते यांनी केले आहे.