नैनाविरोधात चक्काजामचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नैनाविरोधात चक्काजामचा निर्धार
नैनाविरोधात चक्काजामचा निर्धार

नैनाविरोधात चक्काजामचा निर्धार

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ९ (वार्ताहर)ः नैनाविरोधात गाव बंद आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने आता निर्णायक लढा देण्याचा निर्धार प्रकल्पबाधितांनी केला आहे. याच अनुषंगाने रिटघर येथे झालेल्या बैठकीत नैना प्राधिकरणाच्या निषेधार्थ चक्काजाम करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नैनाबाधित सर्वच गावांतील शेकडो शेतकरी चिपळे येथे झालेल्या बैठकीला हजर होते. या वेळी नैना प्रकल्पासंदर्भात पुढील रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीला माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी १९८४ च्या लढ्याची माहिती देताना सर्वांना सोबत घेऊन तशाच प्रकारचा लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळात आवाज पोहोचवण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. त्यानुसार विधिमंडळात पुढील तीनचार दिवसांमध्ये नैना प्राधिकरणाबाबत विषय चर्चेला येणार आहे. तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. त्याचबरोबर भविष्यात नैनाविरोधात न्यायालयीन लढा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील एकमताने घेण्यात आला आहे.
-----------------------------------
वाहनांच्या रॅलीचे नियोजन
२५ दिवसांपासून सुरू असलेल्या नैना गावबंद आंदोलनात जवळपास ३५ गावे बंद ठेवण्यात आली आहेत. या आंदोलनाला पनवेल परिसरातील गावांनी उस्फूर्त प्रतिसाद देत नैनाला असलेला विरोध प्रखरतेने मांडला आहे. तसेच हा लढा अधिक तीव्र करण्याच्या अनुषंगाने ५ हजार ते ७ हजार वाहनांची मोठी बाईक आणि रिक्षा रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
---------------------------------
मैदानांवर जनजागृतीवर भर
क्रिकेटची मैदाने व बैलगाडा शर्यतीमधूनही मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून या लढ्यामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच गावबंद आंदोलनातून जनजागृती घडत असल्याने शेतकरी कामगार पक्षाने सुरू केलेले हे आंदोलन भविष्यात आणखी तीव्र करणार असल्याचे नैनाविरोधी संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे.
--------------------------------------
अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात सरकारवर दबाव टाकण्यासाठी निर्णायक टोकाचा लढा लढावा लागणार आहे. त्याची तयारी नैना प्रकल्पग्रस्त समिती करत आहे. यासंदर्भात माझे सहकारी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करतील.
- बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप