
वसई विरार पालिकेचा १४ मार्चला अर्थसंकल्प
विरार, ता. ९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प १४ मार्चला सादर होणार आहे. महापालिकेचा हा १३ वा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प महापालिका आणि प्रशासक आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा सादर होईल. यापूर्वी हा अर्थसंकल्प गंगाथरन डी. यांनी सादर केला होता.
मागील अर्थसंकल्पात कोरोनामुळे रखडलेली कामे व अन्य आरोग्य सुविधांकरता तरतूद केली गेली होती. मात्र या अर्थसंकल्पात आयुक्त कोणत्या नव्या संकल्पना व कामांसाठी तरतूद करतात, याकडे वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे वसई-विरार महापालिकेच्या निवडणुका मागील तीन वर्षे लांबल्या आहेत. याचे परिणाम म्हणून महासभेच्या अनुपस्थितीत पालिकेला अर्थसंकल्प सादर करावा लागत आहे. मागील वर्षी पालिकेवर प्रशासक असलेल्या आयुक्त अनिलकुमार पवार यांनी साधारण दोन हजार ३४७.६८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात या वर्षी आणखी १०० ते २०० कोटींची भर पडेल, अशी शक्यता पालिका सूत्रांनी व्यक्त केली आहे.
२०२०-२१ मध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेकरता मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली होती. शिवाय त्या आधीच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या विकासकामांना पुढे नेण्याचे सूतोवाच २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात करण्यात आले होते. त्याकरीता भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रभाव कायम राहिल्याने या कामांना गती मिळाली नव्हती. ही कामे २०२२-२३ अर्थसंकल्पात मार्गी लावण्यासाठी तरतूद होती. यंदाही त्यातीलच महत्त्वाच्या कामांना प्राधान्य मिळण्याची शक्यता पालिका सूत्रांनी व्यक्त केली आहे.
----------------------
तरतूद कायम राहणार
मागील वर्षीसारखीच आस्थापना खर्च, नगररचना, पथदीप व विद्युत व्यवस्था, अग्निशमन, शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालयीन सेवा, दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण योजना व परिवहन यांच्यावरील तरतूद कायम राहील, असे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे.