
चोरलेली दुचाकी प्रामाणिकपणे केली परत
कासा, ता. ९ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तवा गावाजवळील सेवा रस्त्यावर बुधवारी (ता. ८) रात्रीपासून एक दुचाकी चावीसह ठेवलेली आढळली. नवीन दुचाकी उभी असल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना तेथील समाजसेवक संतोष वझे यांनी पाहिले असता चावी लागलेल्या दुचाकीचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले. तसेच याबाबतची माहिती कासा पोलिस ठाण्याला कळवली. प्रभारी अधिकारी श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी पोहचून दुचाकी मालकाचा शोध घेत तपास सुरू केला. महिनाभरापूर्वीच कासा पोलिस ठाण्यामध्ये दुचाकी हरवल्याची तक्रार आली होती, असे तपासात आढळून आले. घोळ टोल नाक्यावर फास्टटॅग विकण्याचे काम करणारा एक जण तवा गावात राहत होता. त्याची दुचाकी महिनाभरापूर्वी चोरी झाली होती. ती चोरलेली दुचाकी चोरांनी महिनाभर वापरून पुन्हा चोरी केलेल्या ठिकाणी आणून ठेवली. याबाबतीत दुचाकी मालकाशी संपर्क साधून कासा पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.