
जुचंद्रमध्ये जागतिक महिला दिन साजरा
विरार, ता. ९ (बातमीदार) : जुचंद्र (वसई) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक अरविंद जगताप यांनी भूषविले; तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक रंगनाथ नाडेकर, पर्यवेक्षक राजेंद्र काकड तसेच सांस्कृतिक विभागप्रमुख संजय म्हात्रे या वेळी उपस्थित होते. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांनी प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. त्यांच्या जिद्दीस, चिकाटीस व परिश्रमास आपण वंदन केले पाहिजे, असे विचार मुख्याध्यापक अरविंद जगताप यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. या वेळी भानू पाटील, शिक्षिका प्रमिला पाटील, अमृता गावंड सुजाता पाटील, तुषार म्हात्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाटील व प्रास्ताविक पोपटराव जावळे यांनी केले. अविनाश वसावे यांनी उपस्थितांचे आभार मानले.