
क्षयरोग नियंत्रणासाठी जे. जे. रुग्णालयाला मानांकन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : क्षयरोग नियंत्रण व उपचारांसाठी सर ज. जी. समूह रुग्णालयाला ‘उत्कृष्टतेचे केंद्र’ म्हणून केंद्रीय कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयातर्फे मानांकन प्राप्त झाले आहे. देशात अशा प्रकारच्या ५ केंद्रांना सरकारतर्फे मानांकन देण्यात आले आहे.
क्षयरोग निर्मूलन मोहिमेच्या माध्यमातून औषध प्रतिकार, कठीण उपचार करणे यासाठी जे. जे. रुग्णालयाला भारत सरकारने उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून घोषित केले आहे. क्षयग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना उपचारांदरम्यान अनेक प्रसंगांचा सामना रुग्णालयाला करावा लागतो. रेजिमेन तयार करणे, प्रतिकूल औषध तयार करणे, औषध बदली करणे आदी अनेक अडचणी यात येतात. ‘उत्कृष्टतेचे केंद्र’ म्हणून घोषणा झाल्यानंतर सर ज. जी. समूह रुग्णालय येथे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या वेळी डॉ. मलिक परमार, डॉ. सुनीता गेहलोत, डॉ. उषा शेलार, कळवा येथील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व नोडल केंद्र शिवडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली, सर्वोदय रुग्णालय घाटकोपर, शताब्दी रुग्णालय गोवंडी येथील अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी रुग्णांवर उपचारांदरम्यान येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी क्षयरोग केंद्राच्या माध्यमातून योग्यरीतीने मार्गदर्शन केले जाणार आहे. प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. प्रीती मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली या केंद्राचे काम पाहण्यात येणार असून शेकडो रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.
...