उपसभापती प्रदीप वाघ यांचे बेमुदत उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसभापती प्रदीप वाघ यांचे बेमुदत उपोषण
उपसभापती प्रदीप वाघ यांचे बेमुदत उपोषण

उपसभापती प्रदीप वाघ यांचे बेमुदत उपोषण

sakal_logo
By

मोखाडा, ता. ९ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यातील आधार कार्ड केंद्र, जातीचे दाखले, पाणीपुरवठा योजना, रस्त्यांची झालेली वाताहात आणि आरोग्य समस्या अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी उपोषणास सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणास विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली सायदे धरणाचे पाणी सोडून दिले आहे. याउलट दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. मोखाडा तालुक्यातील चास, गोमघर, धामणशेत आणि कारेगाव या पाणीपुरवठा योजनांची कामे दोन ते तीन वर्षांपासून सुरू असून त्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. नळयोजनांची सदोष कामे झालेली असून संबंधित ठेकेदारांना बिल देण्यात आल्याने येथील आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच या योजना पूर्ण कराव्यात, अशी मागणी प्रदीप वाघ यांनी केली आहे.

--------------------
या मागण्यांसाठी आग्रही
तालुक्यातील खोदलेले रस्ते पूर्ववत करून मिळावेत, तसेच शालेय कामकाजासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व इतर दाखले शाळेतच मिळावेत, खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, कुर्लोद आरोग्य केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करावे, आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत, सूर्यमाळ येथील वैद्यकीय अधिकारी यांचे पद भरावे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. या मागण्या शासनदरबारी सोडविण्यासाठी, उपसभापती प्रदीप वाघ यांनी मोखाडा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.