
कोरड्या नद्यांमुळे पाणीप्रश्न गंभीर
वाडा, ता. ९ (बातमीदार) : वाडा तालुक्यात बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, पिंजाळ, गारगावी, देहर्जे व तानसा अशा नद्या आहेत; मात्र नियोजनाअभावी यातील काही नद्या कोरड्या पडतात. तानसा नदीवर बंधारे नसल्याने ती नदी मार्चअखेरपर्यंत कोरडी पडते. त्यामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. यासाठी या नदीवर काही किलोमीटर अंतरावर बंधारे बांधावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वाडा तालुक्यात १७० गावे व २५० हून अधिक पाडे आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तालुक्यात औद्योगिकीकरणाचा ओढा वाहत आहे. त्यामुळे लोकसंख्येतही वाढ होत आहे; मात्र त्यामानाने पाणी समस्येचे निराकरण होत नाही. येथे औद्योगिकीकरणामुळे रोलिंग मिल, शीतपेये कारखाने आले आहेत. या कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असल्याने पाण्याचा मोठा उपसा होत आहे. त्यासाठी खाजगी कूपनलिका, टॅंकरने पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याचे दिसून येत आहे. पूर्वी २०० ते २५० फुटांवर पाणी मिळत होते. आता ५०० फुटांपर्यंत कूपनलिका खोदावी लागते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
-----------------------
तानसा नदीवरील बंधारे फोल
तालुक्यात वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या नद्यांवर काही ठराविक भागात बारमाही पाणी असते. या नद्यांवर काही किलोमीटर अंतरावर बंधारे असल्याने येथे बारमाही पाणी असते; मात्र तानसा नदीवर बंधारे नसल्याने किंवा बांधलेले बंधारे फोल ठरल्याने ही नदी मार्चअखेरपर्यंत आटते. या नदीवर गेल्या दहा-पंधरा वर्षांत जे बंधारे बांधले आहेत, त्यातील अपवाद वगळता काही बंधारे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. जेथे गरजेचे आहेत तेथे बंधारे न बांधता पाणी न साचणाऱ्या ठिकाणी बंधारे बांधल्याने फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे तानसा नदी सध्या कोरडी ठाक पडलेली दिसून येत आहे.
--------------------------
ऐन हंगामात पिकांचे नुकसान
तानसा नदी काठावर जाळे, कोंढले, म्हसवळ, दिनकरपाडा, शिंदेवाडी, उचाट, मेट , डाकिवली, चांबळे, गोराड, केळठण, निंबवली अशी गावे आहेत. या गावांतील अनेक शेतकरी फळे, फुले, भाजीपाला शेती करतात; मात्र ऐन हंगामात पाणी कमी होत असल्याने लावलेले पीक करपून जाते व शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिके घेणे बंद केले आहे.
---------------------
तानसा नदीवर बंधारे बांधल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- कुणाल शिर्के, कार्यकर्ते, जिजाऊ संघटना
-------------------
यापूर्वी तानसा नदीवर काही ठिकाणी बंधारे बांधले आहेत. या वर्षी तानसा नदीवर एकही नवीन बंधाऱ्याचे काम नाही. नवीन बंधारे मंजूर झाल्यास पाणी अडवणे सोपे होईल. त्यामुळे पाणी समस्या भेडसावणार नाही.
- किशोर औचार, शाखा अभियंता, लघुपाटबंधारे उपविभाग, वाडा