वाढत्या वणव्यांनी जंगलाचा नाश

वाढत्या वणव्यांनी जंगलाचा नाश

दीपक हिरे : सकाळ वृत्तसेवा
वज्रेश्वरी, ता. १३ : जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतूबदल या पार्श्वभूमीवर राज्यातील वनक्षेत्र २० टक्‍क्‍यांवरून ३३ टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवलेले असतानाच दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर लागत असलेले वणवे जंगले नष्ट करीत आहेत. जंगलात लागत असलेले वणवे आटोक्यात आणायला आवश्‍‍यक सोयीसुविधांअभावी वनकर्मचारी हतबल झालेले दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी भिवंडी तालुक्यातील मौजे दुगाड रेंज, चिंबीपाडा, उसगाव येथील जंगलात वणवे लागण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भिवंडी तालुका हा निसर्गाने उधळण केलेला व भव्य वनसंपत्तीने बहरलेला, नटलेला आहे. एकेकाळी येथील साग रोम देशात बोटी बांधण्यासाठी निर्यात केला जात असे. येथील सागाचे लाकूड इमारती व फर्निचरसाठी प्रसिद्ध असून, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका व नजीकचा वाडा हा परिसर साग या वृक्षासाठी प्रसिद्ध आहे; मात्र आता वाढती जंगलतोड व मोठ्या प्रमाणात लागत असलेल्या वणव्यांनी येथील वनसंपत्तीचा नाश होताना दिसत आहे.
भिवंडी वन परीक्षेत्र तालुक्याला नऊ हजार हेक्टर वनक्षेत्र हे राखीव लाभले आहे. या वनक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी गणेशपुरी, दुगाड, भिवंडी, चिंबीपाडा असे परिक्षेत्र आहेत. त्‍या तुलनेत येथे वनपाल, वनरक्षक व मनुष्यबळ कमी प्रमाणात आहेत. एवढ्या मोठ्या वनक्षेत्रात डोंगरावर वणव्याने लागणाऱ्या आगी विझविण्यासाठी फक्त तीन ब्लोअर मशीन (आग प्रतिबंधक यंत्र) असून, त्या आग विझविण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत. यामुळे येथील वन कर्मचारी वाढत्या वणव्यापुढे हतबल झालेले दिसतात.
-------------------------------------
प्राण्‍यांच्‍या शिकारीसाठी वणवे
भिवंडी तालुक्यातील अनेक पाडे जंगलात वसलेले आहेत. या पाड्यांवर जाणारे रस्ते जंगलातून जात असून, वाटसरू पेटती विडी, सिगारेट जंगलात टाकून देत असल्यानेही वणवे लागतात. सध्या या ठिकाणी जंगलातील बराचसा भाग वनपट्टेधारकांना जमीन कसण्यासाठी दिला आहे. शेतीची राबणी करतानाही वणवे लागतात. विशेषतः जंगलातील ससे, रानडुक्कर, भेकर, रानकोंबड्या यांना पकडण्यासाठी शिकारी वणवे लावतात. अशा अनेक कारणांमुळे लागत असलेले वणवे आटोक्यात आणण्यासाठी वन कर्मचारी हतबल झाल्‍याचे दिसून येत आहेत.
-----------------------------------
तीनच आग प्रतिबंधक यंत्रे
स्थानिक नागरिक, वनपट्टे धारक, वनहक्क समितीच्या सदस्यांनी एकत्र येऊन वन कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला तर निश्चितच हे वणवे आटोक्यात येतील. येथील प्रशिक्षित वनकर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक यंत्र (ब्लोअर मशीन) अधिक प्रमाणात पुरवणेही गरजेचे आहे. एक ब्लोअर मशीन १० ते १५ कर्मचाऱ्यांचे काम करते; मात्र येथे एका परिक्षेत्राला सध्या तीनच मशीन देण्यात आल्या आहेत.
-------------------
कोट
सामाजिक वनीकरण, वन विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. बहुतेक ठिकाणी न केलेली वृक्ष लागवड वणव्यात पेटून नष्ट झाली हे दाखवण्यासाठीही वन कर्मचाऱ्यांकडून वणवे लावले जात असल्याचा आरोप निसर्गप्रेमींकडून केला जातो; मात्र अशा वृक्ष लागवडीच्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेही अद्याप असा वणवा लागलेला नाही.
- जगदीश एस. पाटील
वारेटचे प्रकल्प वन क्षेत्रपाल
------------------------------
होळी सणानंतर वन हद्दीत वनपाल, गार्ड, मुकादम यांची गस्त वाढवली आहे; मात्र ससा व रानडुकराच्या शिकारीसाठी अज्ञात व्‍यक्‍तीकडून या आगी लावल्या जात आहेत; लवकरच त्यांचा बंदोबस्त केला जाईल.
- विनोद ध्रुवे, भिवंडी रेंजचे वनपरीक्षेत्र अधिकारी
-----------------------
जंगले वाचवण्यासाठी वणवे लागू नये अथवा लागलेच तर सर्वांनीच मदतीसाठी पुढे येण्याची आज गरज निर्माण झाली आहे. वणवे रोखण्यासाठी वनविभागाने लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, वन कर्मचारी आणि निसर्गप्रेमी यांच्या संयुक्त प्रयत्नाने अनेकदा वणवे आटोक्यात येऊ शकतात, यासाठी अशा लोकांची स्वतंत्र पथके तयार करण्याची गरज आहे.
- दीपक पुजारी, प्रकाश मोर
पर्यावरण व निसर्गप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com