मुंबईत हरित अच्छादनासाठी पालिकेचा पुढाकार

मुंबईत हरित अच्छादनासाठी पालिकेचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : हवामान बदलांना सक्षमतेने सामोरे जाण्याच्या दृष्टीने, तसेच हवाप्रदूषणाला अटकाव करण्यासाठी मुंबईत हरित आच्छादन व हरित क्षेत्रामध्ये वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. हिरवाई वाढविण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याची गरज लक्षात घेता मुंबईतील हिरवळ कशा प्रकारे अद्ययावत करता येईल, त्यामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकसहभाग कसा वाढवता येईल, अधिकाधिक शास्त्रोक्त बाबी सहजसोप्या रीतीने नागरिकांपर्यंत कशा पोहोचवता येतील, याबाबतचा ऊहापोह नुकताच उद्यान विभागाच्या बैठकीमध्ये करण्यात आला.

नागरिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्था सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत वृक्षलागवडीचे उपक्रम राबवतात. अशा प्रयत्नांना शास्त्रोक्त पद्धतीची जोड मिळणे आवश्यक आहे. त्या दिशेने विचार करता, पालिकेच्या मदतीने हरित आच्छादन आणि जैवविविधता वाढविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, याचा शोध घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय) यांच्या सहकार्याने मुंबईत झाडे लावणे शक्य असलेल्या मोकळ्या व सार्वजनिक लहानसहान जागा शोधणे, पालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावर नागरिकांना स्थानिक प्रजातीची रोपे उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य अशा बाबी तत्काळ सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती या वेळी उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

मुंबई महानगरात प्रत्येक घरापासून ते मोकळ्या सार्वजनिक जागेपर्यंत सर्वत्र हरित आच्छादन व हरित क्षेत्र वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग लाभावा, यासाठी उद्यान विभागाच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वांची पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. सर्व संबंधितांची मते, अभिप्राय, सूचना, विचार संकलित करून त्यास अंतिम रूप देऊन येत्या सहा महिन्यांच्या आत ही पुस्तिका प्रकाशित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पालिकेचे उद्यान विभाग, संबंधित भागधारक आणि विषय तज्ज्ञांच्या बैठकीत ही मार्गदर्शके निश्चित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

स्थानिक, देशी प्रजातींना प्राधान्याची गरज
हिरवळ वाढविण्याचे वैज्ञानिक मार्ग दर्शविणारा पथदर्शी प्रकल्प राबविण्याबद्दलचे अभिप्राय मागवणे, तसेच महानगरातील वृक्षसंवर्धनासाठी ‘वृक्ष दत्तक’ उपक्रमाचा शोध घेणे यानिमित्तानेही बैठकीत चर्चा झाली. उभ्या मांडणीची उद्याने (व्हर्टिकल गार्डन ऍण्ड ग्रीनिंग), गच्चीवरील उद्याने (टेरेस गार्डनिंग) आणि इमारतीच्या भूखंडावर योग्य तेथे झाडे लावताना योग्य नियमावली असली पाहिजे, असे मत या बैठकीत सहभागी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

हरित क्षेत्र वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील, अशी मार्गदर्शक तत्त्वे सांगतानाच मुंबई महानगरातील वृक्षारोपणाची गरज, त्याची प्रक्रिया, कायद्यातील तरतुदी या बाबींचादेखील पुस्तिकेमध्ये समावेश करण्यात येईल आणि सर्व स्तरातील मुंबईकरांना ती पुस्तिका मार्गदर्शक ठरेल, याचा प्रयत्न केला जाईल.
- जितेंद्र परदेशी, अधीक्षक, उद्यान विभाग

हरित क्षेत्र वाढविण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन तसेच शहरातील सर्व भागधारकांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने घर, खिडक्या, बाल्कनी, मोकळ्या जागा, सामुदायिक वापराच्या जागा, मोकळे सार्वजनिक भूखंड, रस्ते, मैदाने अशा ठिकाणी हरित क्षेत्र वाढवण्याला चालना देता येईल. त्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- दीप्ती तळपदे, व्यवस्थापक, डब्ल्यूआरआय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com