Thur, June 1, 2023

भिवंडीत कामगाराची हत्या
भिवंडीत कामगाराची हत्या
Published on : 9 March 2023, 2:22 am
भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : भिवंडीत एका कामगाराने दुसऱ्या कामगाराची हत्या केल्याची घटना शहरातील वंजारपट्टी नाका येथील यंत्रमाग कारखान्यात घडली. या घटनेने शहरातील कामगारांमध्ये खळबळ माजली आहे. दीपक बर्मन (वय ३५) असे मृत कामगाराचे नाव असून तो मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणार आहे. तो आणि आरोपी पिजू बर्मन हे दोघे मित्र यंत्रमाग कारखान्यात रोजंदारी करण्यासाठी भिवंडीत आले होते. शहरातील वंजारपट्टी नाका मार्गावर असलेल्या बुबेरे बिल्डिंगमध्ये ते राहत होते. बुधवार (ता. ८ ) रात्री दोघांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. त्यावेळी पिजू बर्मन याने रागाच्या भरात दीपक बर्मन याच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे दीपकचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.