
डोंबिवलीत एकावर तलवारीने वार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : गैरसमजातून दोन कुटुंबात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन चौघांनी तिघा भावंडांना लाकडी दांडक्याने मारहाण करत एकावर तलवारीने वार केल्याची घटना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर परिसरात घडली. मानपाडा येथील सागांव येथे राहणारा सावन बोत हा मंगळवारी होळीनिमित्ताने आईच्या घरी त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी परिसरात आला होता. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सावनचा भाऊ जीवन हा त्याच्या पत्नीला जेवण का बनविले नाही, असे विचारून तिला शिवीगाळ करत होता. या वेळी शेजारी राहणाऱ्या सुनील चौहान याच्या पत्नीला वाटले की, जीवन तिला शिवीगाळ करत आहे. याविषयी तिने सुनील याला सांगताच सुनील संतापला. त्याने जीवन याच्याशी वाद घातला. याचदरम्यान सुनीलच्या घरातील सोनू, रमेश व अनिकेत यांनीही जीवन त्याचा भाऊ सावन व प्रताप यांना मारहाण करत सावन याच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये सावन गंभीर जखमी झाला. यानंतर चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात सुनील चौहान, रमेश चौहान, सोनू चौहान व अनिकेत या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.