बारावे कचरा प्रकल्पाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावे कचरा प्रकल्पाला आग
बारावे कचरा प्रकल्पाला आग

बारावे कचरा प्रकल्पाला आग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १० : कल्याण पश्चिमेतील बारावे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्यास शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. बारावे येथील घनकचरा प्रकल्पात मागील वर्षी मार्च महिन्यात आग लागून प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या प्रकल्पातील मशिनरी अनेक महिने बंद होत्या. यावर्षी पुन्हा मार्च महिन्यात या प्रकल्पातील कचऱ्यास आग लागली असून यामध्ये मशिनरीचे काही नुकसान झाले आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. कल्याण पश्चिमेला रिंगरोड व उल्हास नदीला लागून असलेल्या बारावे परिसरात कल्याण-डोंबिवली महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. याठिकाणी सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मागील वर्षी मार्च महिन्यात येथील प्रकल्पाला आग लागल्याने प्रकल्पाचे मोठे नुकसान होऊन चार मशिनरी जळून खाक झाल्या होत्या. प्रकल्प बंद असतानाही घंटागाड्यांतून येथे कचरा आणून टाकला जात होता. यामुळे सध्या या ठिकाणी आधारवाडीसारखा कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. शुक्रवारी पहाटे कचरा प्रकल्पातील सुक्या कचऱ्यास आग लागली. सुक्या कचऱ्याने पेट घेतल्याने कचऱ्याचा धूर परिसरातील नागरी वस्तीत पसरला. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुका कचरा असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली.