
बिअर दिली नाही म्हणून हॉटेल मालकावर चाकूने वार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : बिअर देत नसल्याने चौघा आरोपींनी हॉटेल मालकाला मारहाण करत चाकूने वार केल्याची घटना डोंबिवली पूर्वेत गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सिद्धार्थ भालेराव व त्याच्या इतर तीन साथीदारांविरोधात डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. डोंबिवली टिळक चौकातील यशवंत स्मृतीजवळ एक रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये रात्री बाराच्या सुमारास सिद्धार्थ बालाजी व त्याचे तीन साथीदार आले होते. त्यांनी हॉटेल मालक सुधाकर यांच्याकडे बिअरची मागणी केली. यावेळी सुधाकर यांनी हॉटेल बंद झाले आहे. मी तुम्हाला आता बिअर देऊ शकत नाही, असे सांगितले. याचा राग आल्याने सिद्धार्थने सुधाकर यांना शिवीगाळ करत दमदाटी करत हातातील धातूच्या कड्याने त्यांना मारहाण केली. यावेळी आरोपी सिद्धार्थ याने चाकूने सुधाकर यांच्या डोक्यावर वार करत त्यांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात सुधाकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. हॉटेल मालक संघटनेने या हल्ल्याचा निषेध करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.