सदानंद कदम यांना ईडीकडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदानंद कदम यांना ईडीकडून अटक
सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने सदानंद कदम यांना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे ईडीने कदम यांना ताब्यात घेतल्याचे समजते. कदम यांची आता मुंबईत कसून चौकशी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून साई रिसॉर्टप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. शुक्रवारी (ता. १०) पहाटे ईडीचे पथक सदानंद कदम यांचे वास्तव्य असलेल्या दापोलीतील कुडेशी या गावात पोहोचले. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही काळ कदम यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीचे पथक कदम यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यासोबत सातत्याने सदानंद कदम यांचे नाव जोडले जात होते. या प्रकरणात आता त्यांना ताब्यात घेतल्याने ईडीच्या कारवाईला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचे प्रकरण राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. हे रिसॉर्ट अनिल परब यांचे नसून रामदास कदम यांचा भाऊ सदानंद कदम यांचे असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता. साई रिसॉर्ट प्रकरणात आधी अनिल परब यांचेही नाव आले होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात परब यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली होती. साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सर्व सुरू असतानाच कदम यांना ईडीने अटक केल्याने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.