
ठाण्यात जनित्राचा स्फोट एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : शिळफाटा, शिळ-दिवा या ठिकाणी हनुमान हॉटेलसमोर भूमिगत असलेल्या टोरंट पॉवरच्या विद्युत जनित्राला शुक्रवारी सकाळी सहा वाजून २० मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याचदरम्यान आग लागलेल्या जनित्राचा स्फोट झाल्याने शेजारील आर. के. टायर या दुकानात झोपलेल्या विशाल सिंग (वय ३५) यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला; तर आणखी एक जण जखमी झाला आहे.
या स्फोटात भूमिगत असलेली डिझेल पाईपलाईनला धक्का बसून तिच्यातून गळती सुरू झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश येत नसल्याचे दिसून आले. दरम्यान, या आगीबरोबर धूरही मोठ्या प्रमाणात पसरले. शिळफाटा येथे विद्युत केबल आणि जनित्राच्या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी डायघर पोलिस, टोरंट पॉवर विद्युत, आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दल या विभागांनी तात्काळ धाव घेतली. याचदरम्यान आगीचा भडका उडून आग लागलेल्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये शेजारील दुकानात झोपलेला विशाल सिंग याचा होरपळून मृत्यू झाला; तर दुसरीकडे नाल्यावरील सिमेंट काँक्रीटीकरण उडाले. त्यावेळी तेथून रिक्षा नेणारा रिक्षाचालकही त्यामध्ये जखमी झाला आहे. स्थानिकांनी जखमी रिक्षाचालकाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. दरम्यान, या स्फोटामुळे भूमिगत डिझेल पाईपलाईनला धक्का बसल्याने त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान ५ फायर वाहन व ६ वॉटर टँकर व १ रेसक्यू वाहन पाचारण केले आहे. ही घटना पनवेलहून मुंब्र्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर घडल्याने वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत प्रयत्न सुरू होते.
मुंब्र्यात जनरल स्टोअर्सला आग
ठाणे : मुंब्रा-कौसा येथील श्रीलंका या ठिकाणी तळ अधिक पाच मजली ‘रेहान बाग’ या बिल्डिंगच्या तळ मजल्यावरील जनरल स्टोअर्स या दुकानाला शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. जवळपास पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून दुकानाचे नुकसान झाले आहे. मात्र या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.