उन्हाच्या तडाख्याला करा गुडबाय

उन्हाच्या तडाख्याला करा गुडबाय

वैभवी शिंदे ः नेरूळ
उन्हाळ्याची चाहूल लागली की पांढऱ्या किंवा फिकट रंगांच्या कपड्यांची शोधाशोध सुरू होते. कारण फिक्या, पांढऱ्या रंगांचे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत, तर परावर्तित करतात. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात सुती कपडे घालण्याकडे अनेकांचा कल असतो. केवळ पांढऱ्या रंगांचे कपडे असून उपयोग नसतो; तर त्या कपड्यांचा पोतही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे कपड्यांच्या प्रकारातील खादी, सुती, चिकन, मलमल अशा हलक्या व सैलसर कपड्यांना अधिक मागणी आहे.
--------------------------------
खादी ः उन्हाळा सुसह्य करेल असे म्हणजे खादीचे कपडे. थोडासा आऊट ऑफ फॅशन मानल्या जाणाऱ्या खादीकडे तरुणाईही वळू लागली आहे. गेल्या दोनतीन वर्षांत मोठमोठ्या फॅशन डिझायनर्सची खादीला मागणी आहे. खादी डिझाईनला फुलांच्या प्रिंटचे, उभ्या रेघांचे, प्लेन असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. मुलींसाठी जिन्स टॉप, हाफ लाँग कुडता असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात पिवळा, केशरी, हिरवा, पोपटी, गुलाबी, पांढरा, निळा, करडा, चॉकलेटी, खाकी असे विविध रंग आहेत. महिलांसाठी साड्यांचाही उत्तम पर्याय आहे. चंदेरी, कलकत्ता, पटोला, साऊथ इंडियन अशा विविध प्रकारच्या डिझाईनचा समावेश आहे. मुलांसाठीही खादीमध्ये भरपूर प्रकार आहेत. रंगीत आणि टिपिकल डिझाईनचे शर्ट आहेत. फिक्या रंगांची यात चलती आहे.
--------------------------------------------
सुती ः उन्हाळ्यात सुती कपड्यांना भरपूर मागणी असते. जीन्स टॉप, शॉर्ट आणि लाँग कुडता, जीन्स असे प्रकार यात पाहायला मिळतात. त्यांची किंमत ३५० ते ५०० पासून सुरू होते. निव्वळ कॉटनच्या साड्या, लहान मुलींना फ्रॉक, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या महिलादेखील उन्हाळ्यात अशा साड्यांचा पर्याय निवडतात. तसेच कॉटनमध्ये मिळणारे शर्टही असतात. त्यांची किंमत ६०० पासून सुरू होते. सूती झब्बेदेखील मिळतात. लहान मुलांसाठी सूती कपड्यांचा पर्याय उन्हाळ्यासाठी उत्तम ठरत आहे.
-------------------------------------
लिनन ः सूती कापडानंतर जर कोणते फॅब्रिक जास्त पसंत केले जात असेल तर ते तागाचे आहे. लिनेन एक अतिशय मऊ आणि सैल विणलेले फॅब्रिक आहे. हे कापड अतिशय आरामदायक आहे. उन्हाळ्यात शरीरातून बाहेर पडणारा घाम लिनेन कापड पूर्णपणे शोषून घेते. त्यामुळे अनेक महिला या दिवसांत या ब्रॅंडचे कपडे वापरताना दिसतात.
----------------------------------------
शिफॉन ः मलमलप्रमाणेच वजनाला हलका असलेला आणखी एक प्रकार म्हणजे शिफॉनचा. यातदेखील फिके रंग उपलब्ध असतात आणि मुख्य म्हणजे फुलाफुलांच्या किंवा पोलका डॉट्सचे प्रिंट यात अधिक दिसतात. या शिफॉनमध्ये शक्यतो जीन्सवरचे टॉप, स्कार्फ आणि साड्या अधिक प्रमाणात दिसतात. हलके आणि सुसह्य रंग असल्यामुळे तरुण मुलींमध्ये आणि महिलांमध्ये याची चलती आहे. यांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशाच आहेत.
----------------------------------
चिकन ः जवळ जवळ आणि बारीक छिद्रांची प्रिंट, मुलायम व मुख्य म्हणजे सुताचा वापर आणि रिच लुक असल्यामुळे चिकनच्या कपड्याला महिलांमध्ये भरपूर मागणी आहे. यातले रंगही फिकट असल्यामुळे रणरणत्या उन्हात डोळ्यांना सुखद वाटते. यात अधिक करून पंजाबी ड्रेस, कुडते आणि साड्याच पाहायला मिळतात. मुलांसाठी केवळ कुडते पाहायला मिळतात. चिकनचे कपडे जरा महाग असतात, त्यामुळे केवळ ड्रेस पीस किंवा कुर्ता पीसची सुरुवात १००० ते २००० रुपयांपासून सुरू होते.
--------------------------------------
मलमल ः पूर्वी उन्हाळा लागला की ठेवणीतले मलमलचे शर्ट बाहेर पडायचे. पारदर्शक, वजनाला अतिशय हलके असल्यामुळे उन्हामुळे होणारी अंगाची लाही लाही या कपड्यांमुळे होत नाही. या कपड्यांकडे बघितलं की काहीसं कूल वाटतं. मलमलचा हा पर्याय केवळ मुलांसाठी उपलब्ध आहे. तेही घरात घालण्यासाठी. लहान मुलांसाठीही मलमलचे शर्ट बाजारात उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com