
खारघर-पनवेल मार्गाला झळाळी
खारघर ः बातमीदार
सायन-पनवेल महामार्गावरील सीबीडी बेलापूर ते कळंबोली मार्गावर बंद असलेले पथदिवे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिकेने एका एजन्सीची नेमणूक केली असून तीनशे विद्युत खांबांवर एलईडी दिवे लावणार असल्यामुळे महामार्ग प्रकाशमय होणार आहे.
--------------------------------------
शीव-पनवेल महामार्गावरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत होते. अशातच महामार्गावर पसरलेल्या अंधारामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवासी वर्गातदेखील नाराजी होती. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश सरकारकडून निर्गमित करण्यात आले. शासन आदेशानंतर पनवेल महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी भारती विद्यापीठ ते पनवेल महापालिका हद्दीत असलेल्या महामार्गावरील पथदिव्यांचे सर्वेक्षण केले होते. तसेच पथदिवे आणि सिग्नल यंत्रणा देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा आठ कोटी रुपये निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेला हस्तांतर केला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेले पथदिवे सुरू होणार असल्यामुळे महामार्ग प्रकाशमय होणार आहे.
--------------------------------------------------
एलईडी दिवे लावण्याचा निर्णय
भारती विद्यापीठकडून कळंबोली मार्गे पनवेल महापालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर जवळपास तीनशे पथदिवे आहे. जीर्ण तसेच नादुरुस्त असलेले दिवे काढून त्या ठिकाणी नवीन पथदिवे उभारले जाणार आहेत. तसेच या महामार्गावर एलईडी दिवे लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. महामार्गावर असलेल्या पादचारी पुलाखाली बंद असलेले दिवे सुरू केले जाणार आहेत.
-----------------------------
भारती विद्यापीठाकडून खारघर, कामोठे-कळंबोली मार्गे पुणे दिशेने जाताना पनवेल पालिका हद्दीतील महामार्गावर एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. यासाठी नेमणूक केलेल्या एजन्सीला दोन दिवसांपूर्वी कामाचे आदेश देण्यात आले आहेत.
- संजय जगताप, शहर अभियंता, पनवेल महापालिका