कासा शासकीय विश्रामगृहाला घरघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा शासकीय विश्रामगृहाला घरघर
कासा शासकीय विश्रामगृहाला घरघर

कासा शासकीय विश्रामगृहाला घरघर

sakal_logo
By

कासा, ता. ११ (बातमीदार) : कासा परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून विश्रामगृह बंद असल्याने सध्या ते ओस पडले आहे. मागील सात वर्षांपासून या विश्रामगृहाचा वापरही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे सरकारी अधिकारी, पदाधिकारी आणि इतर पाहुणे मंडळींना विश्रामगृह बंद असल्याने गैरसोय होत आहे.
तालुका स्तरावर महत्त्वाचे विश्रामगृह प्रत्येक महिन्यात अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात. त्यामुळे ठाणे, नाशिक, पालघर, मुंबईसह इतर जिल्ह्यांमधून कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विश्रामगृह बंद पडल्याने अनेक वेळा बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची खासगी हॉटेलमध्ये व्यवस्था करावी लागते. विश्रामगृहात पिण्याच्या, बाहेरील वापराच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. छप्पर गळके असल्याने नवीन पत्रेही टाकण्यात आले होते. विश्रामगृहाची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. रात्री सगळीकडे अंधार असतो. विश्रामगृहासमोर प्रवासी वाहने उभी असतात.
विश्रामगृह परिसरात काही वर्षांपूर्वी उद्यान विकसित केले होते. झाडे लावून विश्रामगृह परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते. सध्या मात्र या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. परिसरातील लॉन पूर्णत: सुकून गेले असून काही झाडेही सुकली आहेत. उद्यानाच्या सुशोभीकरणाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. किमान या भागातील उद्यानाची निगा राखली असती तर हा परिसर आणखी आकर्षक दिसला असता, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

------------------
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे
डहाणू तालुक्यातील कासा हे ठिकाण मध्यवर्ती असून मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर आहे. जवळच दोन मोठी धरणे आहेत. येथून जवळच डहाणू समुद्रकिनारा असून जव्हार पर्यटन क्षेत्र ४० किलोमीटर अंतरावर आहे. सेल्वास, दमन येथून ३० किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक व्यवसाय, उद्योगानिमित्त लोक येथे येत असतात. महालक्ष्मी, संतोषी माता मंदिर, आशेरी गड, गंभीर गडसुद्धा येथून जवळच आहे.
अनेक राजकीय पक्ष आंदोलनाची सुरुवात या भागातूनच करतात. त्यामुळे विश्रामगृहाला विशेष महत्त्व आहे.


--------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस भूमिका घेऊन कासा येथील शासकीय विश्रामगृहात सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. बंद असलेले विश्रामगृह वापरण्यास सुरू करावे, तसेच देखभालीसाठी कर्मचारी नेमावेत. जीर्ण झालेल्या कंपाऊंडचे बांधकाम करावे.
- सतेंद्र मातेरा, एकलव्य आदिवासी क्रांती दल

-------------------
गेल्या अनेक वर्षांपासून कासा येथील विश्रामगृह बंद असून त्याच्या दुरुस्तीचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. जीर्ण कंपाऊंड व समोरील गेट याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली आहे. सध्या या विश्रामगृहात आदिवासी विकासअंतर्गत असणाऱ्या हॉस्टेलचे विद्यार्थी राहत आहेत. त्यांच्या राहण्याची सोय दुसरीकडे झाली की पुन्हा दुरुस्तीचे काम करता येईल.
- अजय जाधव, उपअभियंता, डहाणू बांधकाम विभाग