
वसई विरार महापालिकेत ‘लक्ष्मीदर्शन’
वसई, ता. १२ (बातमीदार) : वसई विरार शहर महापालिकेने मालमत्ता कर वसुलीत गतवर्षीचा विक्रम मोडीत काढला असून तिजोरीत तब्बल एक कोटी पन्नास लाख रुपयांची भर पडली आहे. मार्च महिना अखेरपर्यंत ४०० कोटीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांत तब्बल २१ कोटी ५० लाखाची वसुली करण्यात आली आहे.
वसई-विरार शहर महापालिका हद्दीत रहिवासी, औद्योगिक व्यापारी दुकाने मिळून एकूण नऊ लाख २७ हजार मालमत्ता धारक आहेत. या वर्षी कर भरण्यासाठी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. वसई-विरार महापालिकेचे प्रशासक अनिलकुमार पवार हे उत्पन्नात भर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे. समाजमाध्यम, ऑनलाईन तसेच वाहनाच्या माध्यमातून उद्घोषणा देऊन मालमत्ता कर भरण्याचे आवाहन प्रशासन करत आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मार्च अखेरपर्यंत ३२५ कोटी रुपयांची वसुली झाली होती; मात्र १० मार्च पर्यंत २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३२२ कोटी रुपयांचा पल्ला पार करण्यात आला असल्याने पुढच्या वीस दिवसांत एकूण ७८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट यंदा मार्चअखेरीस पूर्ण होणार असल्याची आशा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
--------------------
वसई-विरार महापालिका मालमत्ता कर संकलन विभाग करवसुलीचा रोज आढावा घेत असून, यंदा गतवर्षीपेक्षा कर जमा करण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत हा आकडा अधिक असेल. चारशे कोटीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे. अभय योजनेच्या सवलतींमुळेदेखील मालमत्ताधारक करभरणा करण्यासाठी पुढे येत आहेत.
- समीर भूमकर, उपायुक्त, मालमत्ता कर संकलन विभाग.
-------------------
गेल्या वर्षी - ३२१ कोटी
यंदा - ३२२ कोटी ५० लाख
-------------
अभय योजनेतून २६ कोटी ४३
वसई-विरार शहर महापालिकेच्या अभय योजेनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करदात्यांना करत आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागातून रिक्षा व अन्य वाहनाने उद्घोषणा केल्या जात आहेत. ३६ हजार २८३ मालमत्ताधारक पुढे आले असून, अभय योजनेमुळे एकूण २६.४३ कोटी रुपये नागरिकांनी कर रूपाने पालिकेत जमा केले आहेत.