मोखाड्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप बनला तारणहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोखाड्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप बनला तारणहार
मोखाड्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप बनला तारणहार

मोखाड्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप बनला तारणहार

sakal_logo
By

भगवान खैरनार ः मोखाडा
सोशल मीडिया हा तरुण-तरुणींच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. या माध्यमातून अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्याचे समोर आले आहे; मात्र मोखाड्यातील ‘विचार तुमचे आमचे’ या ग्रुपने ‘समाज माध्यमातून समाजाची मदत’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. किनिस्ते येथील हरीश शिंदे या तरुणाने हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. आदिवासी बांधवांवर ओढवलेल्या आपत्तीच्या प्रसंगात तात्काळ धाव घेऊन त्‍यांना आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे. त्यासाठी ग्रुपमधील सदस्य सढळ हस्ते साह्य‍य करीत आहेत.
मोखाडा तालुक्यातील किनिस्ते येथे पांडुरंग रघुनाथ दाते यांच्या घराचे ५ मार्च रोजी झालेल्‍या वादळी पावसाने मोठे नुकसान केले होते. ‘विचार तुमचे आमचे’ या व्हॉट्सअॅप ग्रुपला ही बातमी कळताच तत्परतेने पीडित कुटुंबाला मदतीचा हात देत त्यांना तीन हजार रोख रकमेच्या स्वरूपात मदत करण्यात आली. याप्रसंगी ग्रुपचे अॅडमीन हरिश शिंदे, आनंद शिंदे, प्रकाश मडके, अनंता झुगरे, चंद्रकांत दाते, अक्षय शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘विचार तुमचे आमचे’ या ग्रुपमध्ये ४५७ सदस्य आहेत. यामध्ये सर्व स्तरांतील नागरिक आहेत. या सदस्यांना मदतीचे आवाहन करून आर्थिक मदत उभी केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात आपत्ती ओढवलेल्या १२ आपत्तीग्रस्त कुटुंबांना या ग्रुपने आर्थिक मदतीचा हात देऊन सावरले आहे.
-----------------------------------
मदतीचा ओघ कायम
ग्रुपमधील प्रत्येक सदस्याने खारीचा वाटा उचलत शंभर ते हजार रुपयांपर्यंतची मदत ग्रुप अॅडमिनकडे जमा केली. मदतीचा आकडा ४७ हजार ७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या डोलारा येथील सवरा, दिवे, किनिस्तेतील हिलम, खोचच्या रेणुका ओळंबे, कारेगावच्या चंदर सप्रे या आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी २५ किलो तांदूळ व डाळ, साखर, तिखट, हळद, मीठ, चहा पावडर, बेसन, कडधान्य अशा स्वरूपात जीवनावश्यक वस्तू (किराणा) तसेच रोख एक हजार ५०० रुपये या स्वरूपात मदत केली आहे. इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील वेठबिगारी प्रकरणात मृत्यू झालेल्या गौरी आगीवले हिच्या कुटुंबाला पाच हजार रोख रक्कम देण्यात आली होती. धुळे जिल्ह्यातील खरडबारी नुकसानग्रस्त कुटूंबांना दहा हजारांची मदत पाठवण्यात आली होती.
-------------------------------
दात्‍यांच्‍या पै-पैचा हिशेब
मोखाड्यातील बेरीस्ते व वाडा तालुक्यातील मंगरूळ येथील जळून खाक झालेल्या घरांच्या कुटुंबांना अनुक्रमे प्रत्येकी दहा व पाच हजार देण्यात आले होते. जमलेल्या पैशांचा आणि मदत केलेल्या रकमेचा तसेच शिल्लक रकमेचा हिशोब लगेचच ग्रुपवर टाकला जातो. समाजासाठी तरुणांची धडपड आणि योग्य वेळी आर्थिक मदतीचा हात यामुळे ‘विचार तुमचे आमचे’ हा व्हॉटसअॅप ग्रुप मोखाड्यात तारणहार बनला आहे. त्यामुळे ग्रुपचे अॅडमिन तसेच सदस्यांचे या उपक्रमाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.
-------------------------
यथाशक्‍ती देणगीचा हातभार
डोल्हारा, खोच, किनिस्ते आणि कारेगाव येथे पावसाळ्यात मुसळधार पावसाने घरांची पडझड झालेल्या आदिवासी कुटुंबांना, तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील पीडित कुटुंबाला या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांनी यथाशक्ती देणगी गोळा करून जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
----------------------------------------
मोखाड्यात वादळी पावसाने घराचे छप्पर उडालेल्या आदिवासी कुटुंबाला मदत करताना ग्रुप अॅडमिन हरीश शिंदे व सदस्य.