दोन लाख बालके ठणठणीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन लाख बालके ठणठणीत
दोन लाख बालके ठणठणीत

दोन लाख बालके ठणठणीत

sakal_logo
By

वसई, ता. १५ (बातमीदार) : बालकांच्या आजाराचे निदान व्हावे व वेळेवर उपचार मिळावेत म्हणून पालघर जिल्हा आरोग्य प्रशासनाने कंबर कसली असून, महिनाभरात जिल्हा पिंजून काढला आहे. जिल्‍ह्यातील एकूण दोन लाख २२ हजार ४०३ बालकांची तपासणी करण्यात आली असून, यातील दोन लाख १० हजार बालके ठणठणीत आढळली आहेत. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियानातून ही आकडेवारी समोर आली आहे. या अभियानाच्‍या माध्‍यमातून आजारी बालके शोधून त्‍यांच्‍यावर योग्य ते उपचार करणे सहज शक्‍य होणार आहे.

ताप, जंतुसंसर्ग, रक्तक्षय, कुष्ठरोग, क्षयरोग, हृदयविकार यांसह अन्य आजार बालकांना भविष्यात धोका निर्माण करू शकतात. त्‍यांना वेळीच उपचार मिळावेत म्हणून सुदृढ बालक मोहीम सुरू करण्‍यात आली आहे. जेणेकरून जिल्ह्यातील प्रत्येक बालक हा शारीरिक व मानसिकरीत्या तंदुरुस्त राहील. पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, पालघर, मोखाडा या आठ तालुक्यात आरोग्य प्रशासनाने बालकांची तपासणी करण्यासाठी अंगणवाडी, बालवाडी, शाळा व इतर संस्थांची निवड केली. यात २६४ संस्था या डहाणूतील आहेत. वाडा येथे दोन हजार ३३१ बालके आजारी असल्याचे समोर आले आहे. त्यातील २०९५ जणांवर औषधोपचार करण्यात आले; तर वसई तालुक्यातील पाच बालकांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे.
--------------------------------
विशेष पथकाची नियुक्‍ती...
‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ या अभियानात सर्व (ग्रामीण, शहरी व पालिका क्षेत्रातील) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यात शासकीय व निमशासकीय शाळा, आश्रमशाळा, अंध-दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथालय, समाजकल्याण व आदिवासी विभाग वसतिगृहांमधील मुले, मुली, खासगी नर्सरी, बालवाड्या, खासगी शाळा तसेच शाळाबाह्य मुलांच्‍या तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
------------------------------
कोट
पालघर जिल्ह्यात जागरूक बालक सुदृढ बालक मोहीम हाती घेऊन बालकांची तपासणी केली जात आहे. आजारी आढळल्यास त्यांना योग्य ते उपचार, औषधोपचार दिले जात आहेत. काही मुलांना शस्‍त्रक्रियेसाठी देखील संदर्भित करण्यात आले आहे.
-डॉ. सागर पाटील, जिल्हा आरोग्य विभाग
------------------------------
जिल्ह्यातील तपासलेल्या संस्था - आजारी आढळलेली बालके - औषधोपचार केलेली संख्या
२५५४ -१२१९३ -१०३७६
--------------------
तालुके व तपासणी केलेली बालके - शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केलेली बालके
डहाणू - ५३६२३ - १
जव्हार - १५४४७ - २
मोखाडा - १२६३८ - ०
पालघर - ६७२०४ - ०
तलासरी - २५४३८ - २
वसई - १३४५६ - ५
विक्रमगड - १३५५५ - १
वाडा - २१०४२ - ०
-----------------
आजाराची शहानिशा...
सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभाग समन्वयाने हे अभियान राबवले जाते. ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागात पथकाच्या माध्यमातून लहान बालकांना कोणता आजार आहे का, याची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येते.
----------------------------
उद्दिष्टे...
आजारी बालकांना औषधे, शस्त्रक्रिया करून उपचार करणे.
सुदृढ व सुरक्षित आरोग्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन
प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा देणे
वजन, उंची, तापमान तपासणे
व्यंग असल्यास त्याचे निदान करणे
कृष्ठरोग, क्षयरोग, दमा लागणे, हृदयविकार संशयित रुग्ण ओळखणे