
बोर्डी किनाऱ्यावर भला मोठा मृत कासव
बोर्डी, ता. ११ (बातमीदार) : बोर्डीच्या समुद्रकिनाऱ्यावर नाना-नानी पार्कजवळ भला मोठा कासव मृतावस्थेत आढळून आले आहे. शनिवारी पहाटे मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना हे कासव आढळून आले. सुमारे ५० किलो वजन असलेल्या मृत कासवाशेजारी काही अंडी आढळून आली आहेत. या घटनेची माहिती स्थानिक मच्छीमार रामदास मांगेला यांनी वन्यजीव संरक्षण समितीचे सदस्य सूर्यहास चौधरी यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन मृत कासवाला सुरक्षितस्थळी हलवले. याविषयीची सूचना बोर्डीतील वनक्षेत्रपाल कार्यालयाला देण्यात आली. कासव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर आले असताना मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत कासवाच्या पोटात काही अंडी असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला असून डहाणू उपवनसंरक्षक कार्यालय येथे असलेल्या कासव संवर्धन केंद्रात याबाबत अधिक संशोधन केले जाईल, असे सूर्या चौधरी यांनी सांगितले.