
गवत-शेण-मातीच्या घराला नवा लूक
श्रीकांत खाडे, अंबरनाथ
ग्रामीण भागात आणि निसर्गाच्या सानिध्यात शेण-माती, गवत आणि चुना यांसारख्या वस्तूंचा वापर करून बनवलेल्या टुमदार, दुमजली गोलाकार नैसर्गिक घराला ठाण्याचे चित्र-शिल्पी लखीचंद जैन यांनी नवा आकर्षक साज दिला आहे. प्राचीन भारतीय भूमी आणि भित्तीचित्र कलेचा वापर त्यांनी ही घरे अत्यंत कलात्मकरीत्या सजवली आहेत.
शहरी जीवनातील गोंगाट, दगदग आणि हवेच्या वाढत्या प्रदूषणाला कंटाळून शहराकडील नागरिक महानगरांपासून निसर्गाच्या जवळ वास्तव्य करण्याला प्राधान्य देत आहेत. बदलापूरजवळील आंबेशिव गावात प्रकाश आणि किरण अमाटी या पिता-पुत्र जोडीने निसर्गाच्या सानिध्यात उपलब्ध असलेली माती, वाळलेले गवत, शेण आणि दगड-चुना साहित्याचा वापर करून टुमदार दुमजली नैसर्गिक घर बांधले आहे.
अमाटी यांच्या घराला ठाण्याच्या कळवा भागातील प्रसिद्ध चित्र-शिल्पी आणि ‘मांडणा’ या प्राचीन लोककलेचे अभ्यासक जैन यांच्या संकल्पनेतून नवे रूप प्राप्त झाले आहे. तीन राष्ट्रीय पुरस्कारांसह ‘मरुधारा सन्मान’ आणि ‘सवाई जयपूर’ने जैन यांना सन्मानित करण्यात आले आहे.
घराच्या अंतर्गत सजावटीच्या प्रक्रियेत, वरचा मजला ‘आध्यात्मिक’ अभ्यास कक्ष म्हणून विकसित करण्यात आला आहे. येथे आतील भिंतीवर पारंपरिक भारतीय शिल्प-चित्र निर्मिती तंत्राचा वापर करून, पाण्यात भिजलेली स्थानिक माती, गायीचे ताजे शेण, नैसर्गिक डिंक, वाळलेले गवत, तांदूळ आणि गव्हाच्या साळेची भुकटी यांचे मिश्रण वापरून उत्कीर्ण (रिलिफ) शिल्प तयार केले आहेत. या गोलाकार भिंतीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चार दिशांना चिन्हभाषेत चार गोलाकार शिल्पे कोरलेली आहेत. ही शिल्प अभिव्यक्ति आंतरिक जागरणाशी संबंधित ‘तंत्र’ने प्रेरित आहे. यात ‘शक्ति’ला प्रतीकात्मकरित्या दर्शविण्यात आले आहे. या शिवाय ‘मांडणा’ कलेचा वापर करून ही शिल्पे आणि भिंती सुशोभित केल्या आहेत. वापरलेले नैसर्गिक रंग डोळ्यांना सुखद अनुभव देतात. नैसर्गिक रंगांच्या समृद्धतेची आणि त्यांच्यात लपलेल्या आध्यात्मिकतेची ही अनुभूती देतात. या घराच्या बाहेरील आणि आतील भिंती नैसर्गिक रंगांनी रंगवल्या आहेत आणि सर्व दरवाजे-खिडक्या आणि आरशाच्या जागा ‘डेकोरेटिव्ह फॉर्म’ने सजवल्या आहेत.
---------------------------------
मातीच्या घरांच्या आतील आणि बाहेरील भिंती सुशोभित करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. पूर्वीचे लोक नकारात्मक ऊर्जा आत येऊ नये म्हणून मातीच्या घरांच्या आणि अंगणांच्या बाहेरील भिंतीवर पांढऱ्या, लाल-काळ्या रंगाने प्रतिकात्मक चिन्ह कोरत होते. अशा चित्रांकनाला राजस्थानात ‘मांडणा’ म्हणतात.
-लखमीचंद जैन