अंबरनाथमध्ये रंगणार शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल

अंबरनाथमध्ये रंगणार शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल

अंबरनाथ, ता. ११ (बातमीदार) : अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील कला महोत्सवांमध्ये गणना होत असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल यंदा १६ ते १९ मार्चदरम्यान प्राचीन मंदिराच्या प्रांगणात रंगणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून फाऊंडेशनच्या माध्यमातून आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे. यंदा पहिल्यांदाच सायंकाळच्या मुख्य कार्यक्रमांसोबतच सकाळच्या सत्रातही सांगीतिक मेजवानी रसिकांना मिळणार आहे. चार दिवसांच्या महोत्सवात कला दालनांमध्ये जुन्या-नव्या चित्रकारांच्या कलाकृतींचे, तसेच छायाचित्रांचे प्रदर्शन रसिकांना पाहता येईल. अनेक प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश असणारा खाद्य महोत्सव ही खवय्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. महोत्सवाच्या प्रवेशिका विविध केंद्रांवर उपलब्ध आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कला कुंभमेळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी केले आहे.
-----------------------------
चार दिवस भरगच्‍च कार्यक्रम
खासदारांच्या पुढाकाराने पाच वर्षांपूर्वी महोत्सवाला सुरुवात करण्‍यात आली. पहिल्या वर्षापासून रसिकांचा महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. हजारो रसिक या कार्यक्रमाला उपस्थित असतात. रसिकांचा प्रतिसाद आणि उत्साह पाहता यंदा तीनऐवजी चार दिवस हा फेस्टिव्हल रंगणार आहे. यंदा इंद्रधनुष्याप्रमाणे संगीत क्षेत्रातील सात प्रसिद्ध कलावंत चार दिवसांत शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.
------------------------------
सात लोकप्रिय कलावंतांचा सहभाग
चारही दिवशी मुख्य रंगमंचावर संध्याकाळी कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर यंदा पहिल्यांदाच शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये संगीत पहाटही अनुभवता येणार आहे. १८ आणि १९ मार्च रोजी मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या रंगमंचावर सकाळी सात वाजता खास संगीत मैफिली आयोजित केल्‍या आहेत. चार दिवसांच्या सप्तरंगी संगीत महोत्सवात राकेश चौरसिया, पंकज उदास, अमित त्रिवेदी, अनुराधा पौडवाल, मोहित चौहान, मैथिली ठाकूर आणि शंकर महादेवन हे सात लोकप्रिय कलावंत त्यांच्या लोकप्रिय रचना सादर करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com