ब्रम्हांड, वाघबीळ पादचारी पुलाला मंजुरी

ब्रम्हांड, वाघबीळ पादचारी पुलाला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाण्यातील घोडबंदर भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या वतीने पादचारी पुलाची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात येत होती. एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोच्‍या सुरू असलेल्या कामामुळे पादचारी पुलांना परवानगी मिळत नव्हती. अनेक वेळा एमएमआरडीएच्या आयुक्तांची सरनाईक यांनी रहिवाशांसह भेट घेऊन घोडबंदर रोडवरील पादचारी पुलाचे महत्त्‍व पटवून दिले. त्यानंतर हे दोन्हीही पादचारी पूल बांधण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक बाजू तपासून ठाणे पालिकेला मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेनेदेखील पादचारी पूल उभारण्याच्या कामास गती देत निविदा प्रक्रिया राबवली आहे.
घोडबंदर मार्गावर या परिसरात पादचारी पूल नसल्यामुळे अनेक नागरिकांना व वृद्धांना रस्ता क्रॉस करणे अवघड झाले होते. घोडबंदर रोडवरून भरधाव वाहणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊन काही नागरिकांचे प्राणही गेले होते. अखेर, आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा करून ब्रह्मांड व वाघबिळ येथील पादचारी पुलाचे काम मंजूर करून घेतले. मेट्रोच्या कामामध्ये कुठेही अडचण होणार नाही अशा प्रकारे ब्रह्मांड येथील पादचारी पुलाची लांबी ५२.२९ मी., रुंदी ३.७८ मी व उंची ५.६५ मीटर ठेवण्यात येणार आहे. वाघबिळ येथील पादचारी पुलाची लांबी ४३.९४ मी., रुंदी ३.७८ मी व उंची ५.६५ मीटर ठेवण्यात येणार आहे. दोन्ही बाजूला चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बनवण्यात येणार आहेत, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
------------------
मुख्यमंत्र्यांकडून मागणी मान्‍य
कासारवडवली, ओवळा, भायंदरपाडा व गायमुख या परिसरामध्येसुद्धा फुट ओव्हर ब्रीज उभारण्याची मागणी नागरिकांमधून सातत्याने होत आहे, परंतु सद्यपरिस्थितीमध्ये ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची नसल्याने उर्वरित चार पादचारी पुलांचा खर्च हा एमएमआरडीएने करावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ती मागणी मान्य केल्यामुळे पुढील उर्वरित चारही फूट ओव्हर ब्रीज हे एमएमआरडीएच्या माध्यमातून लवकरच होणार असल्याने घोडबंदर रोडवरील पादचारी पुलाचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.
-------------
लवकरच भूमिपूजन
ब्रह्मांड व वाघबिळ येथे होणाऱ्या पादचारी पुलासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च होणार असून, या दोन्ही पुलांचा कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आला आहे. पुढील आठवड्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com