विरारमध्‍ये अवतरली शिवसृष्‍टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारमध्‍ये अवतरली शिवसृष्‍टी
विरारमध्‍ये अवतरली शिवसृष्‍टी

विरारमध्‍ये अवतरली शिवसृष्‍टी

sakal_logo
By

प्रसाद जोशी, वसई
दिल्लीच्या तख्‍ताला आव्हान देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसत असतील, याबाबत परकीयांनादेखील उत्सुकता होती. हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांच्या इतिहासाची दुर्मिळ माहिती लोकांपर्यंत पोहचावी. हा जाज्‍वल्‍य इतिहास नवीन पिढीला ज्ञात व्‍हावा यासाठी विरारमधील अमेय क्लासिक क्लब येथे शिवोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शूरवीर शिवाजी महाराजांची गाथा, इतिहास जाणून घेण्यासाठी दुर्गप्रेमींसह पर्यटक व इतिहासप्रेमींची मोठी गर्दी होत असून, या उत्‍सवात येणाऱ्या प्रत्‍येकालाच विरार शिवोत्सव नगरीत शिवसृष्‍टी अवतरल्‍याची अनुभूती मिळत आहे.

ज्ञात-अज्ञात परकीय चित्रकारांनी ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांची प्रतिमा चित्रबद्ध केली. तीच छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे रशिया, जर्मन, लंडन, फ्रान्स, नेदरलँड्स या देशांमध्ये आजही पाहावयास मिळतात. ही दुर्मिळ चित्रे आणि या चित्रांचा प्रदेशांमध्ये जाण्याचा रंजक इतिहास ‘शिवोत्सव’मधून इतिहासप्रेमींना अनुभवता येत आहे. उर्दू, पारशी नाण्यांचे अनुकरण न करता महाराजांनी आपल्या स्वभावाचा विशेष अभिमान दाखवत शिवराज्याभिषेकाच्या वेळी देवनागरी लिपीत पाडलेली स्वतःची नाणी ही इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. ही दुर्मिळ नाणी पाहण्याची संधीही नागरिकांना मिळत आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्यातील विविध किल्ल्यांच्‍या प्रतिकृती देखील येथे साकारण्यात आल्‍या आहेत. या उत्‍सवात तीन हजारांहून अधिक मुलांनी सहभाग घेतला असून, परिसरात पुस्तक प्रदर्शन, खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहेत. नायगाव, जूचंद्र व आजूबाजूच्या स्थानिक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रेखाटलेल्या कलादेखील ‘शिवोत्सवा’त एक वेगळीच अनुभूती देत आहेत.
--------------------------------------
कोट
छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय इतिहास नव्या पिढीपर्यंत जावा यासाठी अमेय क्लासिक क्लबने शिवोत्सवाचे केलेले आयोजन वाखाणण्यासारखे आहे. हा उत्सव नव्या पिढीत उत्साह, प्रेरणा निर्माण करणारा ठरेल, असे उपक्रम ठिकठिकाणी राबवण्यात आले पाहिजेत.
- राजीव पाटील, प्रथम महापौर, वसई-विरार महापालिका
--------------------------------------
नव्‍या पिढीसाठी सुवर्णसंधी
शत्रूशी युद्ध करताना कोणत्या युद्ध साहित्याचा वापर शिवरायांनी केला. ते साहित्य कसे होते. या सर्वांचे प्रत्यक्ष दर्शन घेता येत आहे. विविध तलवारी, भाले, ढाली, तोफा, तोफगोळे यांचाही यात समावेश आहे. याशिवाय इतिहास तज्ज्ञांची विविध व्याख्याने, पोवाडे, शिवबावनी, मर्दानी खेळ, नाट्य असे अनेक कार्यक्रम या निमित्ताने होत असल्याने शिवछत्रपतींचा अनोखा अनुभव नव्या पिढीला अनुभवण्याची संधी प्राप्त झाली आहे.
--------------------------
आज मर्दानी खेळ, पोवाडे
तीन दिवस सुरू असणाऱ्या या ‘शिवोत्सवा’त (ता.१२) मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक प्रणय शेलार यांच्या शिवगर्जनेत आलीम यांच्यातर्फे सादर केले जाणार आहे. इतिहासतज्‍ज्ञ सौरभ कर्डे यांचे व्याख्यान, प्रवीण फणसे व कुटुंबीय पोवाडा सादर करणार आहेत. त्यामुळे विरारमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष होणार आहे.