
घोडबंदर किल्ल्यात उलगडणार शिवरायांचा जीवनपट
प्रकाश लिमये, भाईंदर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टीला राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची सीआरझेडची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याजवळ शिवसृष्टी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या एक मे रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या शिवसृष्टीचे भूमिपूजन होणार आहे.
घोडबंदर येथील किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे. किल्ल्याचे हे ऐतिहासिक महत्त्व ओळखून या किल्ल्याचे संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. राज्य सरकारने हा किल्ला संगोपनासाठी मिरा-भाईंदर महापालिकेला दत्तक म्हणून दिला आहे. एकीकडे किल्ल्याला गतवैभव प्राप्त मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू असतानाच किल्ल्याला लागूनच छत्रपतींच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी साकारण्याचा संकल्प आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
-----------------------
कांदळवन बफर झोन परिसर वगळणार
एकंदर सात एकर जागेत हा प्रकल्प उभा राहाणार आहे. हा परिसर सीआरझेड तसेच कांदळवन क्षेत्रात येत असल्याने राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची सीआरझेडची परवानगी आवश्यक होती. गेल्या तीन वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर सीआरझेडची परवानगी नुकतीच प्राप्त झाली आहे. कांदळवन बफर झोन परिसर वगळून उर्वरित सात एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.
--------------------------
दृष्टिक्षेपात...
शिवसृष्टी उभारण्यासाठी ५३.६८ कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करून महापालिकेने तो सरकारला पाठवला होता. प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाने, तसेच पर्यटन विभागाने यापूर्वीच ‘ना हरकत दाखला’ दिला आहे.
राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यातील पाच कोटींचा निधीही महापालिकेकडे वर्ग झाला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता सीआरझेडची पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली आहे.
आता राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी, जिल्हास्तरीय उच्चाधिकार कार्यकारी समिती यांच्याकडील परवानगी शिल्लक असून, ती मिळवून दीड महिन्याच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.
----------------------------------------------
अशी असेल शिवसृष्टी
शिवसृष्टी सीआरझेडमध्ये असल्याने त्याठिकाणी कोणतेही पक्के बांधकाम केले जाणार नाही. संपूर्ण सात एकर जागेत राज्यातील पन्हाळा, लोहगड, विजयदुर्ग, शिवनेरी, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांच्या फायबरच्या प्रतिकृती याठिकाणी उभारण्यात येणार आहेत. भव्य प्रवेशद्वार, छत्रपतींच्या जीवनावरील प्रदर्शनासाठी प्रदर्शन क्षेत्र, ॲम्पी थिएटर, माहिती केंद्र आदी याठिकाणी असणार आहे. संपूर्ण मराठा साम्राज्याचे दर्शन शिवसृष्टीद्वारे होणार आहे. ही शिवसृष्टी एवढी भव्य-दिव्य असेल की ते एक महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र बनेल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.