रानावनांत रंगाची उधळण

रानावनांत रंगाची उधळण

अजित शेडगे, माणगाव
यंदा पावसाळा लांबला असला, तरी ऋतुनुसार रानावनात विविध रंगाच्या फुलांचा बहर सुरू झाला आहे. रविवारी रंगपंचमी साजरी करण्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकारचे रंग आले असतानाच रानावनातही रंगीत फुलांचा बहर आला आहे. या विविध फुलांनी रचनांमध्ये मुक्तपणे रंगांची उधळण केली आहे. यामुळे परिसरासह रानावनांतही जणू रंगपंचमी साजरी होत असल्याचा भास होत आहे.
महाराष्ट्रात खासकरून कोकणात रंगपंचमीच्या पर्वात रानावनात विविध रंगांच्या फुलांचा बहर आलेला असतो. शिशिराची पानगळ होऊन अनेक झाडांना कोवळी पाने, पालवी यायला सुरुवात होते. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर रानावनात विविध बदल होतात. अनेक झाडांना फुलोरा येतो. अनेक झाडे नखशिखांत फुलांनी बहरलेली असतात. या फुलांचे रंग, गंध तितकेच मोहवणारे असतात. या वर्षी पावसाळा लांबला असला, तरी ऋतुनुसार रानावनात विविध फुलांचा बहर सुरू झाला आहे. रानाची शोभा वाढवणारी, गंध उधळणारी ही फुले कोकणातील सह्याद्री पर्वताची शोभा असून, या रानफुलांचा हा बहर म्हणजे जणू रानाची रंगपंचमी होय.

होळी उत्सवाच्या या काळात रानात झाडांना फुलोरा आलेला आहे. यामध्ये काटेसावर, पळस, चाफा, बोगनवेल, बहावा, पांगिरा, ताम्हण, धामण, अर्जुन; तसेच घराच्या परसदारी बागेतून मोगरा, जाई-जुई, निशिगंधा, जास्वंद अशी अनेक फुलझाडे बहरलेली दिसतात. बहरलेल्या या झाडांची शोभा रानावनात तर दिसतेच, सोबतीला घराच्या अंगणात परसदारी भागातून अनेक झाडे फुललेली दिसतात. रंगपंचमीच्या या आनंदात निसर्गात बहरलेली रानफुले अधिकच उठावदार दिसत आहेत. रानात बहरलेली ही फुले नैसर्गिक रंगांसाठी उपयुक्त असून, त्यांचा उपयोग पर्यावरणपूरक रंगासाठी होत आहे. ग्रामीण, शहरी भागात रंगपंचमीसाठी निसर्गातील या पाना-फुलांचा अनेक जण आवर्जून वापर करतात.

रानात बहरलेली झाडे

काटेसावर : वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज झालेले हे झाड वसंत येण्यापूर्वीच सगळी पाने गळून मोकळे होते. पूर्ण निष्पर्ण होऊन गुलाबी रंगाची फुले बहरून येतात. भारतीय वंशाची ही वनस्पती कमीत कमी पाण्यावर कोठेही उगवते. अगदी खडकातही ही वनस्पती फुलून येते. मोठे फूल पाच पाकळ्या असलेल्या या फुलातील मध गोळा करण्यासाठी खारूताई आणि अनेक पक्षी झाडांवर दिसून येतात. आयुर्वेदात औषधी असलेली ही वनस्पती गावाकडच्या लोकांसाठी पानातील कात म्हणूनही उपयोगी येते. पुराणकथेत भक्त प्रल्हादाचे रूप असलेली ही वनस्पती होळीत मध्यभागी लावून पूजा करतात. याचा उपयोग कोकणात गोकुळाष्टमीची दहीहंडी बांधण्यासाठीही केला जातो.

पळस : वसंत ऋतूतील रानाचे वैभव म्हणजे पळस. तळहाताएवढी रुंद व जाड पाने असणारा हा वृक्ष डिसेंबर महिन्यानंतर फुलोऱ्यास येतो. पळसाला पाने तीनच ही म्हण रूढ करणारा हा वृक्ष. पानगळीनंतर इतका बहरून येतो की लाल रंगाची मुक्तपणे उधळण करतो. होळी उत्सवात बनवल्या जाणाऱ्या नैसर्गिक रंगात मुख्य रंग देणारा हा वृक्ष रंग उद्योगात फार प्राचीन काळापासून महत्त्वाचा असा वृक्ष आहे. लग्नकार्य काळात प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या भोजनाच्या पत्रावळी याच झाडाच्या पानांपासून तयार करतात. आयुर्वेदात औषधी म्हणूनही ही वनस्पती महत्त्वाची आहे.

गुलमोहर : वसंतात गुलमोहराचे फुलणे काही औरच असते. घनदाट सावली देणारा हा वृक्ष ग्रीष्माचा दाह कमी करतो. लाल केसरी फुलांचा गुच्छ मिरवणारी याची फुले मनाला भुरळ घालतात.

पांगारा : जानेवारी ते मार्च महिन्यात बहरणारा हा वृक्ष मऊ आणि लालभडक फुलांनी लक्ष वेधून घेतो. अनेक पक्ष्यांना याची फुले आवडतात. पुराणात श्रीकृष्णाने देवेंद्राच्या बागेतून ही फुले चोरल्याची कथा प्रसिद्ध आहे.

चाफा : वसंताच्या आगमनाच्या स्वागताला गावकुसाबाहेर अन् क्वचित रानात दिसणारा पांढरा चाफा ही वनस्पती कोकणातील साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. नेहमीच अबोल असणारे हे झाड वसंताची चाहूल लागण्यापूर्वीच नखशिखांत बहरून येते. देठांना पांढरेशुभ्र फुलांचे झुपके हे याचे वैशिष्ट्य. रायगडातील गावकुसाबाहेर मंदिराशेजारी हमखास ही झाडे लावलेली दिसतात. मूकपणे उभा असलेला आणि वेडावाकडा वाढलेला हा वृक्ष पूर्ण पाने गाळतो आणि अंगावर पांढरी शुभ्र फुले मिरवतो. सत्यनारायणाची पूजा इतर धार्मिक कार्यात या फुलांचा मुक्तहस्ते वापर होतो. लहान मुलांच्या सवाष्ण घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या विधित छोट्या गवळ्याच्या कानात आणि कसकांडीच्या काटीला याची फुले बांधली जातात. अतिशय मनोहरी असे ते दृश्य असते. फुलांच्या रंग व स्वरूपानुसार या वनस्पतीचा पांढरा चाफा, कवठी चाफा, पिवळा चाफा, कनक चाफा इत्यादी नावे पडली आहेत.

फळझाडांचा मोहोर
फुलझाडांबरोबर आंबा, काजू, जांभूळ इत्यादी फळझाडांचा मोहोरही सुरू झाला आहे. त्यामुळे रानात रंगांच्या उधळणीबरोबर गंधही मोठ्या प्रमाणात दरवळत आहे. या सर्व फळ-फुलांनी वसंत ऋतूचे वैभव बहरून येते. माळरानांवर याबरोबरीने अनेक छोट्या मोठया वनस्पती फुलून येतात.

शिमगोत्सवात साजरी होणारी रंगपंचमी विशेष आहे. विविध रंगांनी ही पंचमी साजरी केली जाते. कोकणात रंगपंचमी साजरी होत असतानाच रानातही याच वेळेस विविध फुले बहरून आली आहेत. यामुळे रानही रंगपंचमी साजरी करताहेत असे वाटते.
- विजय आरसे, निसर्गप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com