अखेर पाणीपुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर पाणीपुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती
अखेर पाणीपुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती

अखेर पाणीपुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती

sakal_logo
By

मोखाडा, ता. ११ (बातमीदार) : मोखाड्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन ते तीन वर्षांपासून रखडलेली कामे, दोनच दिवसांत करण्यात आली आहेत. त्यामुळे पाणीटंचाई, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांची समस्या सुटली आहे. तसेच इतर मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने प्रदीप वाघ यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निवडुंगे, उपअभियंता राजेश पाध्ये, जलसंधारण विभागाचे उपअभियंता वारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, तहसीलदार मयूर खेंगले, गटविकास अधिकारी कुलदीप जाधव आणि पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे उपस्थित होते.
मोखाड्यातील गोमघर, चास आणि कारेगाव नळपाणीपुरवठा योजना गेली दोन ते तीन वर्षांपासून रखडली होती. सायदे धरणाच्या दुरुस्तीचे काम अर्धवट स्थितीत होते. सूर्यमाळ आरोग्य पथकाला वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नव्हते. विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले मिळावेत, तसेच खोडाळ्यात आधार कार्ड केंद्राच्या मागणीसाठी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

----------------------
अनेक कामे मार्गी
वाघ यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तालुक्यात रखडलेले सायदे धरणाचे काम सुरू झाले, गोमघर व चास येथील पाणी योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. कारेगाव येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सूर्यमाळ आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. खोडाळ्यात सोमवारपासून आधार कार्ड शिबिर सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले मिळणार असल्याचे लेखी आश्वासन संबंधित प्रशासनाने दिल्यानंतर प्रदीप वाघ यांनी उपोषण मागे घेतले आहे.