कासार्डे-तर्फेवाडी मुंबई मंडळाची आज सभा

कासार्डे-तर्फेवाडी मुंबई मंडळाची आज सभा

जोगेश्वरी, ता. ११ (बातमीदार) ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर्फेवाडीतील मुंबईमध्ये राहणाऱ्‍‌या रहिवाशांची सार्वजनिक सभा रविवारी (ता. १२) परळ येथील शिरोडकर हायस्‍कूल येथे सायंकाळी चार ते आठ या वेळेत होणार आहे. या सभेमध्ये कणकवली येथील कासार्डे तर्फेवाडीतील जागृत महापुरुषांच्या पिंपळेश्‍वर मंदिराचे जीर्णोद्धा‍रासाठी झालेल्‍या जमा-खर्चाबाबत ताळेबंद सादर करण्‍यात येणार असून मे महिन्‍यात होणाऱ्‍‌या वार्षिक महोत्‍सवाचे नियोजनही करण्‍यात येणार आहे. तसेच नवीन कार्यकारिणीची नेमणूकही करण्‍यात येणार आहे. तरी तर्फेवाडीतील मुंबईस्थित समस्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शेखर तर्फे व बाळा सावंत यांनी केले आहे.

रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः मुलुंड पश्चिमेत हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी मुलुंड विधानसभा अध्यक्ष मनीष तिवारी, वॉर्ड क्र.१०४ अध्यक्ष राजेंद्र मोहिते, के. राजकुमार नाडार, प्रकाश मोटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चिमुकले बनले स्वच्छतादूत
प्रभादेवी : स्वच्छतेचे महत्त्‍व मुलांना कळावे यासाठी दादर समुद्रकिनारी घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छता मोहीम यशस्वी पार पाडली. प्रभादेवी येथील गिगल्स ॲक्टिव्हिटी सेंटरच्या वतीने व जय फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. जय फाऊंडेशनचे अध्यक्ष जय शृंगारपुरे व गिगल्स सेंटरच्या उर्मी शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पालक या मोहिमेत सहभागी झाले होते.

माहिती पत्रक प्रकाशन सोहळा
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः मुलुंडमधील नवसंकल्प या सामाजिक संस्थेच्या १४ व्या वर्षाच्या ‘माहिती पत्रक’चे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून प्रकाशन करण्यात आले. हा सोहळा म्युनिसिपल कामगार म्युझिक लवर्स ग्रुपच्या व्‍यासपीठावर पार पडला. या वेळी मराठी साहित्यिक, कवी, गायक डॉ. शशिकांत गंगावणे, सायकलवरून भारत भ्रमण करणारे पालिका सेवानिवृत्त अधिकारी सतीश जाधव, म्युझिक लवर्सचे गुरुवर्य कांती परमार, नवसंकल्पचे संस्थापक-अध्यक्ष राजेश कांबळे (आर. के.) आदी मान्‍यवर उपस्थित होते. या वेळी मराठी गीतांचा नजराणा म्युनिसिपल कामगार यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता गणता व गीता डांगे यांनी केले.

दत्‍तक वस्‍ती स्वयंसेवकांचा मेळावा
जोगेश्वरी, ता. ११ (बातमीदार) ः दत्तक वस्ती संस्था समन्वय समितीच्या वतीने दत्तक वस्ती, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत काम करणाऱ्‍‌या स्वयंसेवकांचा, कामगारांचा, ‘स्‍वच्‍छता कामगार हक्‍क परिषद’ या विषयावर कामगार मेळावा घेण्‍यात आला. हा मेळावा शुक्रवारी (ता. १०) जोगेश्वरी पूर्व येथील जी. बी. पंत सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला मुंबई पालिकेचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, तसेच कामगारांचा खटला लढणारे ॲड. प्रकाश देवदास, तर अध्यक्ष म्‍हणून अरविंद वानखेडे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला जात पंचायत निर्मूलन समितीच्या प्रमुख दुर्गा गुडीलु यादेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

शेतकरी कामगार पक्षाची धारावीत निदर्शने
धारावी, ता. ११ (बातमीदार) : देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत चालली आहे. यातच भर म्हणून मागील आठवड्यात घरगुती व व्यवसायिक गॅसच्या दरांमध्ये अनुक्रमे ५० व ३५० रुपये अशी दरवाढ झाली. या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने धारावीत निदर्शने करण्यात आली. शेकाप युवा नेत्या साम्या कोरडे यांच्या नेतृत्वात ही निदर्शने पार पडली. साम्या कोरडे व शेतकरी कामगार पक्षाच्या धारावी विधानसभा चिटणीस आत्मादेवी जैसवार यांच्या नेतृत्वाखाली धारावीतील राजीव गांधी नगर येथील महिलांनी या भाव वाढीचा व केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते अख्तर हुसैन कादरी, असगर शेख, इरफान खान, सिराज शेख, रिझवान खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com