वीटभट्टीवरील मुले गिरवतात ग म भ न

वीटभट्टीवरील मुले गिरवतात ग म भ न

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-शहापूर भागात सुरू असलेल्या वीटभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात महिला पुरुषांसह बालकेदेखील मजुरीचे काम करत असतात. या बालकांना मोलमजुरीच्या कामाऐवजी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार डोअर स्टेप स्कूल फाऊंडेशन आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यातील १०७ वीटभट्टीवरील सर्व्हेक्षण करण्यात आले. तेथे ० ते १६ वयोगटातील एक हजार १२ बालके आढळून आली आहेत. या बालकांना त्यांच्या वयोमानानुसार अंगणवाडी आणि शाळांमध्ये प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे आता वीटभट्टीवरील बालके मजुरीच्या कामाऐवजी गिरवतायेत शिक्षणाचे धडे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या योजनादेखील राबवण्यात येत असून अनेक कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी शहापूर तालुक्यासह भिवंडी तालुक्यालादेखील भेट दिली. या वेळी शहापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांना त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान १ ते १६ वयोगटातील बालके त्या ठिकाणी असल्याचे आढळून आले. या वेळी त्यांनी या बालकांना वीटभट्टीवर काम न करू देता, त्यांना शिक्षण घेण्याकडे वळविणे गरजेचे असल्याचे नमूद करीत संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना देत, या बालकांचा शाळा प्रवेश करून घेण्याचे निर्देश दिले होते.

............................
सातत्य टिकवणे गरजेचे
ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ब्रीक टू इंक ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे कुटुंबाचे समुपदेशन करून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात मुलांना आणण्यात येत आहे. असे असले तरी शहापूर तालुक्यातील सापगाव येथील वीट्टभट्टी व शाळा हे अंतर लांब असल्याने व रस्ता ओलांडून मुलांना शाळेत जावे लागत असल्यामुळे अनेकदा पालक शाळेत मुलांना पाठविण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे अनेकदा पालक बालकांना शाळेत पाठवत नसल्याची सबब समोर आली आहे. त्यामुळे या वीट्टभट्टीवरील बालकांचे शिक्षणातील सातत्य टिकून ठेवण्यासाठी येथील शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

.............................
शहापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जी बालके आढळून आली आहेत, त्या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, पोषण आहाराची काळजी घेतली जात आहे. तसेच डोअर स्टेप स्कूल फाऊंडेशन आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या बालकांना प्राथमिक शिक्षण देण्यात येत आहे. तसेच पुढील वर्षी वीटभट्टीवर मजुरीसाठी येणाऱ्या मजुरांच्या बालकांच्या शिक्षणाचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
- मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

............................
समितीचे उद्देश :
- सर्वेक्षण करणे.
- पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करणे.
- शाळेत मुलांची उपस्थिती वाढविण्याबाबत प्रयत्न करणे.
- मुलांचे लेखन, वाचन, आकलन वाढेल याकडे लक्ष देणे.
- मुलांची उपस्थिती वाढवून आयसीडीएस विभागाच्या सोई-सुविधा देणे.
- सहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे.
- मुलांना गणवेश, पुस्तक, आरोग्यसेवा, आहार यासाठी प्रयत्न करणे.
- स्वयंसेवी संस्थांची मदत मिळण्याकरीता प्रयत्न करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com